दारूसह पळविलेला टेम्पो पोलिसांनी पकडला

एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा
दारूसह पळविलेला 
टेम्पो पोलिसांनी पकडला

अहमदनगर (प्रतिनिधी) - दारू घेऊन जाणार्‍या टेम्पो चालकाला छर्‍याच्या बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून चार जणांनी तो टेम्पो पळवून नेल्याची घटना इमामपूर घाटात घडली. पळविलेला टेम्पो राहुरी पोलिसांनी पाठलाग करून चिचोंडी फाटा (ता. राहुरी) येथील हॉटेल स्वामीजवळ पकडला. मात्र, चोरटे पसार झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक अन्सार हसन पठाण (वय 26 रा. माणिकदौंडी ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

पठाण यांनी त्यांच्या टेम्पोमध्ये औरंगाबाद येथील दारू कंपनीतून दारूचे बॉक्स भरले होते. त्यांना त्या दारूची डिलिव्हरी कोल्हापूर येथे करायची होती. ते टेम्पो घेऊन इमामपूर घाटातून जात असताना त्यांना चार लुटारूंनी अडविले.

लुटारूंनी पठाण यांना छर्‍यांची बंदूक व चाकूचा धाक दाखविला. घाबरलेल्या पठाण यांनी टेम्पो लुटारूंच्या ताब्यात देऊन टाकला. याची माहिती त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना माहिती दिली. निरीक्षक दुधाळ यांनी रात्रीच्या गस्तीवर असणार्‍या पथकाला टेम्पो पकडण्याच्या सूचना केल्या. राहुरी पोलिसांनी सदरचा टेम्पो पाठलाग करून पकडला.

Related Stories

No stories found.