आषाढ महिन्यामुळे वरखेडला होऊ लागली गर्दी

बाहेरच्या भाविकांनी येऊ नये; मंदिर समितीचे आवाहन
आषाढ महिन्यामुळे वरखेडला होऊ लागली गर्दी

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील (Newasa) मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वरखेड (Varkhed) येथील श्रीमहालक्ष्मी देवीचे मंदिर (Temple of Goddess Srimahalakshmi) सध्या कोविड 19 (Covid 19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दर्शनासाठी बंद असल्याने बाहेरील भाविकांनी देवी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाने गेल्या दोन वर्षापासून राज्यभर नावाजलेल्या या वरखेड देवीचा यात्रा महोत्सव बंद आहे. मार्च 2020 पासून शासनाच्या विकास आराखड्यात येणारी तसेच खासगी असलेली सर्वच मंदिरे गर्दी टाळण्याकरता व करोनाला रोखण्यासाठी शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच वरखेड येथील श्रीमहालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून भाविक गर्दी करतात. चैत्र पौर्णिमेनंतर तीन चार दिवसाने येथे मोठी यात्रा भरते.

राज्यातुन चार पाच लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच नवरात्र उत्सवात आषाढ महिन्यातही भाविक गर्दी करत असतात. मात्र करोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने अद्याप मंदिर उघडण्यास परवानगी दिली नसल्याने मंदिर बंदच आहे. मात्र शासनाने व्यावसायिकांना व इतर आस्थापनांना नियम व अटी लावत परवानगी दिली असल्याने सर्वच सुरू असल्याने नागरीक पुन्हा नको तिथे गर्दी करू लागले आहेत.

आषाढ महिना सुरू असल्याने व शासनाचे नियम शिथिल झाल्याचा फायदा घेत भाविक येथे मंदिर परिसरात गर्दी करत असून यामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने भाविकांनी येऊ नये असे आवाहन मंदिर समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

करोनाच्या संकटाामुळे गेल्या दोन वर्षापासून मंदिर बंदच आहे. आषाढ महिन्यात दरवर्षीच येथे भाविकांची गर्दी होत असते. मात्र करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोकाही दिसू लागल्याने मंदिर परिसरात शंभर टक्के संचारबंदी ठेवत शासनाला पूर्णपणे सहकार्य करणार.

- कडूपाटील गोरे, सचिव, श्रीमहालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट वरखेड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com