
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
उन्हाळ्याची चाहुल लागून फेब्रुवारी महिन्यातच वातावरणातील तापमानात वाढ होत आहे. उन्हाच्या काहीलीने थंडाव्यासाठी रस्त्यावरील रसवंती गृह व शितपेयांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढु लागली आहे. रसवंती गृह चालकही या हंगामी धंद्यासाठी सरसावले असून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
वातावरणात सकाळ संध्याकाळ गारवा असला तरी सकाळी दहा वाजल्यापासुनच तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. टाकळीभान ते श्रीरामपूर या 15 कि. मी. च्या अंतरादरम्यान सुमारे 40 ते 45 उसाच्या थंडगार रसाची, फळांच्या रसाची व शितपेयांची दुकाने थाटलेली दिसतात. प्रवासात उन्हाने जिवाची काहीली होत असल्याने प्रवासी आपोआपच रसवंतीगृहांचा व शितपेयांचा आश्रय घेताना दिसत आहे. ऊसाच्या थंडगार ताज्या रसाला अधिक पसंती दिली जात असल्याने या मार्गावरील सर्वच रसवंती गृहे फुलून गेली आहेत.
रसवंतीगृह चालकांचा हा हंगामी व्यवसाय असल्याने ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी रसवंती चालक विविध सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही रसवंतीगृह चालकांनी ग्राहकांसाठी टेबल खुर्च्या सोबतच चोपाळे, लहान मुलांसाठी झोके, खेळणी आदी वस्तू ठेवल्या आहेत. वाढत्या महागाई सोबतच यंदा उसाचा ताजा रसही 10 ऐवजी 15 रुपयाला विकला जात आहे. शहराच्या परीसरात तर हा दर 20 रुपये आहे. गारव्यासाठी काही ठिकाणी बर्फाचा वापर टाळुन थेट डिपफ्रिजमध्ये थंड केलेल्या ऊसाचा ताजा रस दिला जावू लागला आहे. त्यामुळे बर्फाची अॅलर्जी असलेले प्रवासी थेट हा थंडगार रस पिण्याला पसंती देताना दिसत आहेत.
उन्हाचा चटका सुरु झाल्याने गारव्याची आवश्यकता असल्याने ग्राहक वाढले आहे. या रस्त्यावर नेहमीच गर्दी असली तरी लग्न तिथी असल्यावर रसवंतीगृहावर मोठी गर्दी होते. ग्राहकांच्या सेवेसाठी चार माणसं असल्याने झटपट सुविधा देता येते. वडाच्या गार सावलीत ऊसाच्या ताज्या रसासोबतच क्षणभर विरंगुळा मिळावा म्हणून चोपाळा व लहान मुलांसाठी झोके, घसरगुंडी आदी सुविधा देण्यात आल्या असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करतात.
- लहानभाऊ बनकर, रसवंती चालक