
वीरगाव |वार्ताहर| Virgav
आग ओकणार्या सुर्यामुळे उन्हाची तीव्रता वाढल्याने वातावरणातील तापमान चाळीशी पार गेले आणि माणसांसहित प्राणी आणि पिकांचीही लाहीलाही झाली. निष्काळजीपणामूळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने शासनाच्या आरोग्य खात्याने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
सध्या सर्वत्र 40 अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघाताच्या तक्रारी वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे शासनाच्या आरोग्य खात्यातील अधिकृत सुत्रांनी सांगितले. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात फिरु नये. खासकरुन शेतात काम करणार्या मजुरांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हात फिरताना मफलर, उपरणे डोक्याला गुंडाळावे. अधिक पाण्याच्या सेवनाबरोबरच लिंबू सरबत, उसाचा रस, इतर फळांच्या रसाचे सेवन करावे. निष्काळजीपणामुळे उष्माघाताने रक्तदाब वाढून मेंदूला इजा होणे किंवा मिरगीचा धोका संभवतो.
अवकाळीने शेतीचे अतोनात नुकसान केले, आता तीव्र उष्णतेने शेती पिके नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहेत. शेतातील उभ्या पिकांना बाजारभाव नाहीत. त्यातच उभी पिके तीव्र उष्णतेने नुकसानग्रस्त झाली. बाजारभाव नसलेले टोमॅटो शेतातच अवेळी पिकून गेलेले आहेत. बर्यापैकी बाजारभाव मिळणारी कोथिंबीरही शेतात जळून चालली आहे. झेंडू, शेवंती आणि इतरही फुलांची झाडे उष्णतेने सुकून गेल्याने करपून गेली.
दुधाच्या बाजारभावात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात शासनाने केली आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शाश्वत उत्पन्न देणारे दुधही आता म्हणावी अशी मिळकत देत नाही. त्यातच वाढलेल्या उष्णतेचा परिणाम दुधाळ जनावरांवर झाला असून दुध उत्पादनात 20 टक्के घट झाली.जनावरांचा चाराही या उष्णतेच्या धगीत अनेक ठिकाणी खाक झाला. आग ओकणारा सुर्य आणि सरकार दोघांनीही दुध उत्पादक अडचणीत आणले. शेतीमालाला बाजारभाव नसताना जगण्याचा शाश्वत आधार दुधाचा आहे. परंतु आता हा धंदाही तोट्याचा ठरु लागल्याची भावना अकोले तालुक्यातील टाकळीचे दुध उत्पादक रामहारी तिकांडे यांनी व्यक्त केली.
पंधरा दिवसांहून अधिक काळ सुर्याची दाहकता सुरु असून अजूनही काही दिवस तापमान वाढलेले राहील अशी शक्यता आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. अहमदनगर जिल्हाही या वणव्यात भाजून निघत आहे. धरणांचा पाणीदार तालुका असणार्या अकोल्यातही तीव्र उष्णतेने माणसांसहित, प्राणी आणि पिकांचीही लाहीलाही झाली आहे.
जीवघेणे निर्जलीकरण उष्णतेमुळे शरीराची पाणी आणि क्षार बाहेर फेकून तापमान नियंत्रित ठेवण्याची प्रक्रिया सुरु असते. मात्र पाणी, लिंबू पाणी विविध पेयांचे सेवन न झाल्यास व्यक्तीच्या शरीराचे निर्जलीकरण होऊन त्याला उष्माघाताचा त्रास होतो. मात्र निर्जलीकरण होण्याची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून व्यक्तीला तीव्र झटका येण्याची शक्यता असते. या झटक्याला वैद्यकीय भाषेत ‘सेरेब्रल व्हिनस सायनस थोम्ब्रायसिस’ असे म्हणतात.