तेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त : निर्मळ

सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना झालेल्या बागांवर कमी प्रादुर्भाव
तेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त : निर्मळ

लोणी|प्रतिनिधी|Loni

मागील काही दिवसात सातत्याने झालेला पाऊस, ढगाळ हवामान आणि काही वेळेस 85 टक्क्यांच्या आर्द्रतेमुळे डाळींब बागांना तेल्या रोगाच्या विषाणूचा सर्वाधिक विळखा असल्याचे निरीक्षण कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि कृषि विभागाने संयुक्तरित्या केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे.

ज्या डाळींब उत्पादकांनी सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संतुलीत अन्नद्रव्याचे चांगले व्यवस्थापन केले आहे. त्यांच्याकडे या रोगाचे प्रमाण खुप कमी आढळून आल्याचे सांगण्यात आले.

राहाता तालुक्यातील अस्तगाव, पिंप्री निर्मळ, नांदूर, तरकसवाडी, चोळकेवाडी, कोल्हार या परिसरातील डाळींब बागांना तेल्या रोगाच्या विषाणूचा सर्वाधिक फटका बसल्याने डाळींब उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेवरून बाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्र आणि तालुका कृषि विभाग यांनी या नुकसान झालेल्या डाळींब बागांची संयुक्तपणे पाहणी करुन याबाबतचा अहवाल तयार केला आहे.

बाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.संभाजी नालकर, तालुका कृषि आधिकारी बापूसाहेब शिंदे, फलोत्पादन विभागाचे अभ्यासक पुरुषोत्तम हेंद्रे, किटकशास्त्र तज्ञ भरत दंवगे यांनी प्रत्यक्ष बागांमध्ये जावून शेतकर्‍यांशी संवाद साधला

बाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर म्हणाले की, डाळींब बागांना 15 मार्चच्या पुढे पाणी सुरु करण्यात आले. अशा डाळींब बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आला. आंबेबहार उशिरा घेतल्यामुळे फळांची सेंटीग एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गेली. त्यानंतर झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका या डाळींब बागांना बसला आहे. थोड्या प्रमाणात असलेले डाळींबावरील तेलकट डाग जास्त प्रमाणात हवेमुळे पसरत गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जमिनीतील ओलाव्यामुळे हा रोग नियत्रंणात आणण्यात उत्पादकांपुढे अडचणी निर्माण झाल्या, मात्र ज्या डाळींब उत्पादकांनी सुरुवातीपासुनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संतुलित अन्नद्रव्याचे व्यवस्थापन केले त्यांच्याकडे या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आल्याचे डॉ. नालकर यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीमध्ये तेलकट डाग व रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी डाळींब बागांवर कॉपर ऑझीक्लोराईड 500 ग्रॅम, स्ट्रेप्सोसायक्लीन 40 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून तातडीने त्याची फवारणी करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दर 10 दिवसांनी बागांवर सुडोमोनास 1 लिटर आणि बॅसिलस 1 लिटर जीवाणूंची 200 लिटर पाण्यातून फवारणी करण्याचेही डाळींब उत्पादकांना सुचित करण्यात आले आहे. रोगावर प्रतिबंध ठेवण्यासाठी जमिनीमध्ये शेंद्रीय कर्व वाढविण्याभर देवून झाडांची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याचे कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांमार्फत सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com