तेल्या रोगाला वैतागून शेतकर्‍याने डाळिंब बाग तोडली
सार्वमत

तेल्या रोगाला वैतागून शेतकर्‍याने डाळिंब बाग तोडली

भरपाईची मागणी

Arvind Arkhade

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

शेतकर्‍यांना कायम अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वैतागलेले शेतकरी रभाजी बाबुराव खोसे व सुभाष भाऊसाहेब सांगळे हे डाळिंब बागा तोडून टाकत आहेत.

शासनाने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांतूनच पुणतांबा येथील शेतकरी खोसे यांनी एक एकर 10 गुंठे क्षेत्रात पाच वर्षापूर्वी 350 डाळिंब झाडे लावली होती तर शेतकरी सांगळे यांनी एक एकर 20 गुंठे क्षेत्रात 450 डाळिंब झाडे सहा वर्षांपूर्वी लावली होती.

या बांगाचे संगोपन अतिशय योग्य पद्धतीने केले होते. दरवर्षी अनेक अडचणींचा सामना करून बाग वाचवीत होते. याकरिता मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत होती. मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात होत असे. एवढे करून उत्पन्न त्या प्रमाणात मिळत नव्हते, असे खोसे व सांगळे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी खर्च जाऊन उत्पन्न मिळेल या भरवशावर शेतकरी होते. परंतु यावर्षी डाळिंबावर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही रोग हटत नाही हे पाहून शेतकरी रभाजी खोसे यांनी डाळिंब बाग तोडण्याचा निर्णय घेतला. तसेच सुभाष भाऊसाहेब सांगळे यांनी देखील वैतागून डाळिंब बाग तोडण्याचा निर्णय घेतला. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खोसे व सांगळे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com