माळवाडगावात रुग्णांच्या घरी जाऊन तहसीलदारांनी केले मार्गदर्शन

रुग्णांना विलगीकरण कक्षात केले दाखल
माळवाडगावात रुग्णांच्या घरी जाऊन तहसीलदारांनी केले मार्गदर्शन

माळवडगाव (वार्ताहर) - येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोविड सेंटर विलगीकरण कक्षाला तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट दिली. करोना रोखण्यासाठी मार्गदर्शन करत विलगीकरण व्यवस्था स्वच्छता नियोजनाबाबत श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

कोविड सेंटरमधील रुग्णांना दिल्या जाणार्‍या वैद्यकीय सुविधा, चहा नाश्ता, अन् रुग्णांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून ते चकित झाले. ग्रामपंचायत करत असलेल्या उपाययोजनांची लेखी नोंद ठेवावी. माळवाडगावातील करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची माहिती घेत जे रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले नाही त्या रुग्णांची तातडीने दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर, परिचारिका, पोलीस पाटील, कामगार तलाठी हा स्टाफ बरोबर घेत स्वत: रुग्णांच्या घरी जाऊन कुटुंबियांना विनंती केली. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल केले. करोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरी न थांबता विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, असे आवाहनही तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.

यावेळी सरपंच बाबासाहेब चिडे, पोलीस पाटील संजय आदिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल शेख, डॉ. कैलास सैंदोरे, आरोग्य सेविका, कामगार तलाठी, आशा सेविका, करोना दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com