टवाळखोरांपासून वाचवा.. मुली रस्त्यावर!

..प्रसंगी शिक्षण सोडण्याचा इशारा, अकोलेतील घटना
टवाळखोरांपासून वाचवा.. मुली रस्त्यावर!

अकोले |प्रतिनिधी| Akole

सातत्याने काही तरुण व मुलांपासून होत असलेल्या त्रासाला वैतागलेल्या शेंडी येथिल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी काल रस्त्यावर उतरल्या. आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी करीत घोषणा देत निषेध मोर्चा काढून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आम्हाला या टवाळखोरांपासून संरक्षण मिळाले नाही तर प्रसंगी आम्हाला शाळा -महाविद्यालयांत येणे बंद करावे लागेल, असा इशारा देत या विद्यार्थीनिंनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

शेंडी येथे टवाळखोर मुले उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थींनीची कायम छेड काढत असतात. विद्यार्थीनींना शालेय ग्रुपवरून फोन नंबर घेऊन त्रास देणे, मोटारसायकलवरून विद्यार्थिनींना त्रास देणे, मोटारसायकल आडवी लावणे, भररस्त्यात आडवे होणे, विद्यार्थिनींना बघून हावभाव करणे, रस्त्यातच धमकावणे असा प्रकार कायम टवाळखोरांचा सुरू होता.

मागील काही दिवसांपूर्वी एका बारावीच्या विद्यार्थिनीला रस्त्यातच एका मुलाने दमबाजी केली होती तर दोनच दिवसापूर्वी एका विद्यार्थ्यांने अनेकांच्या मोबाईल वरुन फोन करत शिवीगाळ केली होती. विशेष म्हणजे या मुलीला हा मुलगा गत एक वर्षापासुन कायम त्रास देत होता. शेवटी वैतागुन सदर मुलीने आपल्या पाल्यांना या संदर्भात कानावर घातले होते. सदर मुलीचे शिक्षण थांबविण्यापर्यंत पालकांची मनस्थिती तयार झाली होती . विशेष म्हणजे ही मुलगी बारावी सायन्स वर्गात असून प्रंचड हुशार आहे.

शेवटी या मुलीची सहनशिलता संपली व तिने ईतर मुलींच्या मदतीने या मुलासह ईतरही टवाळखोरांना धडा शिकवयाचा हिम्मत केली. अशा एकूण पन्नास ते साठ विद्यार्थींनी एकत्र येत रस्त्यावर आल्या व मुलींची सुरक्षा झालीच पाहीजे म अशी नारेबाजी करत थेट विद्यालय गाठले. या ठिकाणीही प्राचार्यांना मुलींच्या टवाळखोरांपासुन सुरक्षा करण्याचे हमीपत्र मागितले असून महिला सुरक्षा स्थापन करण्याचे आवाहन केले.

सदर मुलींनी एका निवेदनाद्वारे दररोज कॉलेज भरताना व सुटताना पोलिस प्रोटॅक्शनची मागणी केली आहे. हे निवेदन शेंडीच्या सरपंच सौ. वनिता भांगरे यांच्यासह प्राचार्य दिलीप रोंगटे यांनी स्विकारले. यावेळी या मुलींच्या संरक्षणासाठी शेंडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ कायम उभे राहणार असल्याचे शेंडी ग्रामपंचायतच्या वतीने जिंतेद्र भांगरे यांनी सांगितले. यावेळी शेंडीच्या सरपंच वनिता भांगरे, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे, जिंतेद्र भांगरे, पांडुरंग उघडे व ईतर शिक्षक वर्ग उपस्थित होता.

तर राजुर पोलिसांकडूनही सदर घटनेची गंभीर घेतली गेली असुन सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश इंगळे यांनीही टवाळखोरांविरुद्ध कडक भुमिका घेत काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलींना त्रास देणा-यांना कायद्याचा बडगा उगारला जाणार असुन विद्यार्थिंनीसाठी आपला मोबाईल नंबर खुला केला आहे. मुलींनी संपर्क साधत तक्रार करावी, मुलीचे नाव गुपित ठेवले जाईल असे त्यांनी सांगितले.

शेंडी येथील विद्यार्थींनी बाबत टवाळखोरांची हयगय केली जाणार नसुन विद्यार्थीनींची काढणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल . विद्यार्थींनीनी 8805560100 या नंबरवर संपर्क साधावा.

- गणेश इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, राजुर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com