अल्पवयीन मुलीची छेड; आरोपीला सक्तमजुरी

पाथर्डी तालुक्यातील घटना; जिल्हा न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीची छेड; आरोपीला सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी दोषीधरून एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दिलीप भगवान बडे (वय 27 रा. चिंचपुर पांगुळ, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, 16 जून, 2019 रोजी रात्री 08:30 चे सुमारास पीडित मुलगी व तिची आई या त्यांच्या घराबाहेर ओट्यावर झोपलेल्या असताना दिलीप बडेे तेथे आला. त्याने त्याच्या अंगावरील कपडे काढून पीडित मुलीच्या अंगावरील पांघरूण ओढून तिच्या हाताला धरून मिठी मारली. पीडित मुलगी व तीच्या आईला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पीडित मुलीची आई मध्ये पडली असता त्याने तिला उचलून जमिनीवर खाली आपटले. झालेल्या झटापटीत पीडित मुलगी व तिच्या आईला दुखापत झाली.

त्यानंतर काही वेळाने पीडित मुलीचे वडील घरी परत आल्यावर दिलीप बडे त्यांना म्हणाला की, ‘मी तुझे बायको व पोरीकडे आलो तुला काय करायचे ते करून घे’, असे म्हणून त्यांना दगडाने डोक्यात व लाथाबुक्क्यांनी मारले. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी मेव्हण्याला फोन करून बोलावून घेतले. आरोपीने त्यांनादेखील दगडाने मारहाण केली. त्यानंतर पीडित मुलीने पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरूध्द फिर्याद दिली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूध्द भादंवि कलम 354, 324, 504, 506 व पोक्सो कायदा कलम 7 व 8 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जावळे यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांचेसमोर झाली. आरोपीला भादंवि कलम 354 अन्वये दोषी धरून 1 वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, कलम 323 अन्वये दोषी धरून 6 महिने सक्तमजुरी, कलम 504 अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी आणि कलम 506 अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे.

यांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या

या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे -शिंदे यांनी काम पाहिले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, पीडित मुलीचे आई- वडिल, जखमी नातेवाईक साक्षीदार, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार नंदा गोडे, उत्कर्षा वडते, पोलीस शिपाई भिंगारदिवे यांनी विशेष सरकारी वकील केळगंद्रे-शिंदे यांना मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com