गुरूजी करोना सर्वेक्षणाच्या कामात

11 हजार शिक्षकांना कोव्हिड ड्युटी
गुरूजी करोना सर्वेक्षणाच्या कामात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या वर्षभरापासून थेट अध्यापनाच्या कामापासून दूर असणार्‍या प्राथमिक शिक्षक आता करोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी आयोजित सर्वेक्षण मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. करोना सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य पथकात प्राथमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील 11 हजार प्राथमिक शिक्षक करोना ड्युटीवर असणार आहेत.

जिल्ह्यात करोना साखळी तोडण्यासाठी 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीत जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून या पथकात आरोग्य कर्मचारी, एक अंगणवाडी सेविका आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. हे पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, ऑक्सीजन पातळी, पल्स रेट, तसेच करोनाची इतर लक्षणे तपासतील.

ही तपासणी करून संशयित रुग्ण असतील तर त्यांची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवतील. गावाची कुटुंब संख्या विचारात घेऊन सात दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. या पथकामध्ये जिल्ह्यातील 11 हजार प्राथमिक शिक्षक सहभागी आहेत.

विभागीय महसूल आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कुटुंब सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी निश्चित केलेल्या आरोग्य पथकात शिक्षकांचा समावेश केला आहे. नियुक्त करण्यात येणार्‍या शिक्षकांना करोनाचे काम करावे लागणार आहे.

- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी प्राथमिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com