शिक्षकांच्या बदल्या साखळी पध्दतीने न झाल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार

आंतरजिल्हा बदल्या || अतिरिक्त मुख्य सचिवांचा इशारा
शिक्षकांच्या बदल्या साखळी पध्दतीने न झाल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हातंर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आधी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची साखळी पध्दतीने बदली करण्यात यावी, ही कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण न झाल्यास आणि त्यातून न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास संबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना जबाबदार धरण्याचा इशारा राज्याचे अतिरिक्त मुख्य आयुक्त राजेश कुमार यांनी दिला आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी बिंदूनामावली ऑनलाईन पध्दतीने अपलोड करण्याबाबत नुकतेच अतिरिक्त आयुक्त कुमार यांनी स्वतंत्रपणे आदेश काढले आहेत. यात आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या या देखील ऑनलाईनच होणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या अधिपत्याखाली या शिक्षकांचे रोस्टर (बिंदूनामावली) विभागीय महसूल आयुक्त यांच्या कक्षाकडून तपासून घ्यावीत. ही बिंदूनामावली तपासून ती ऑनलाईन शासनाकडे अपलोड नसल्याने आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांसाठी विलंब होत आहे. यासाठी तातडीने ही माहिती ऑनलान भरावी, यासाठी रविवार, दि.17 जुलै शेवटचा दिवस देण्यात आला आहे.

दुसरीकडे 2022-23 या वर्षातील शिक्षकांच्या बदल्या अद्याप झालेल्या नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असून शाळा सुरू झाल्या असल्याने शिक्षकांच्या बदल्यांना अजून विलंब करणे शक्य नाही. यामुळे आंतरजिल्हा शिक्षकांची बिंदूनामावली अपलोड होणार नाहीत, त्या जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदांची संख्या शून्य समजून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी साखळी पध्दतीने आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या न झाल्यास त्यास संबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना जबाबदार धरण्याचा इशारा कुमार यांनी दिला आहे.

आंतरजिल्हानंतर जिल्हा

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संपल्यानंतर लगेच जिल्हातंर्गत शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून यासाठी राज्य पातळीवरून ऑनलाईन रंगित तालिम घेण्यात आलेली आहे. तसेच बदली पात्र शिक्षकांची यादी देखील जिल्हा पातळीवर पाठविण्यात आली असून या बदली पात्र मधून निकष पूर्ण करणार्‍या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया देखील ऑनलाईन होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com