1 हजार 735 गुरूजींच्या आतापर्यंत बदल्या

संवर्ग चारमधील अवघड क्षेत्रातील अवघ्या 46 बदल्याची प्रक्रिया बाकी
1 हजार 735 गुरूजींच्या आतापर्यंत बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. शेवटचा असणार्‍या संवर्ग चारमधील अवघड क्षेत्रातील 46 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणे बाकी आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत संवर्ग एक, दोन आणि तीन तर संवर्ग चारमधील तिसर्‍या टप्प्यापर्यंत एकूण 1 हजार 735 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. येत्या 8 दिवसांत संवर्ग चारमधील शेवटच्या टप्प्यातील अवघड क्षेत्रातील 46 शिक्षकांच्या बदल्या झाल्यावर एकूण 1 हजार 781 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

कोविड संसर्गाचे दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. महिनाभरापूर्वी संवर्ग एक ते तीनमधील बदली पात्र 662 गुरूजीची बदली झालेल्या होत्या. त्यानंतर संवर्ग चारमधील पहिल्या टप्प्यात एकल असणार्‍या 1 हजार 34 शिक्षकांच्या आणि बदलीची प्रक्रिया झाली.

यामुळे आतापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची संख्या 1 हजार 735 पर्यंत पोहचली असून गेल्या तीन वर्षापासून गुरूजी बदलीच्या प्रतिक्षेत होते. यंदाला शिक्षकांच्या बदल्यांना मुर्हूत लागला आहे. आता संवर्ग चारमधील शेवटच्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. या ठिकाणी 46 जागा रिक्त असून या जागा भरल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अवघड क्षेत्रातील 46 जागा रिक्त असून या ठिकाणी बदली पात्र शिक्षकांची यादी आज सकाळी प्रसिध्द होणार आहे. ती प्रसिध्द झाल्यानंतर अवघड क्षेत्रात बदलीसाठी पात्र असणार्‍यांना पसंतीक्रमाने शाळा भराव्या लागणार असून शिक्षकांकडून भरण्यात येणार्‍या जागा प्राधान्य क्रमांने ऑनलाईनने संगणकाद्वारे निवड करून या ठिकाणी शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर यंदाच्या गुरुजींच्या बदल्यांचे दिव्य पार पडणार आहे.

बदली झालेल्या शिक्षकांना मे महिन्यांत कार्यमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात याबाबत अद्याप कोणतेच आदेश निघालेले नाहीत. मात्र, हे शैक्षणिक वर्षे संपूण त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षे सुरू होण्याची आधी बदली पात्र शिक्षकांना त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याची शक्यता शिक्षण विभागाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com