
संगमनेर |वार्ताहर| Sangamner
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व डी.टी.एड शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. एक जूनला सुरू झालेल्या प्रशिक्षणाचा कालावधी 15 जूनला संपत होता. मात्र परिषदेच्या वतीने राज्यातील शिक्षण संघटनाची मागणी लक्षात घेऊन 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील सुमारे एक लाख शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण 01 जून 2022 पासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे.
राज्यात एकूण 94.541 प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दि. 14 जुलै पर्यंत 52 हजार 551 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दि. 31 जुलै पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ज्या प्रशिक्षणार्थ्यींचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणार्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणार्या तुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे. अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील 45 दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.
दोन दिवस संकेतस्थळ राहणार बंद
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने स्प्रिंग बोर्ड यावरती प्रशिक्षण दिले जात आहेत. सदरचे प्रशिक्षणासाठीची सुविधा दि. 23 व 24 जुलै 2022 रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत सेवा अद्ययावतीकरण या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस प्रणालीचा वापर करू नये. दि. 25 जुलै, 2022 पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु राहणार आहे.
राज्यातील ऑनलाईनचा प्रयोग यशस्वी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रसिद्ध परिषदेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने एकाच वेळी एक लाख शिक्षकांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातला पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. परिषदेच्या या प्रयोगा अंतर्गत सुमारे 95 हजार शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंद केली आहे. संपूर्ण प्रशिक्षणाची प्रक्रिया नाव नोंदणी ते प्रमाणपत्र ही ऑनलाईन स्वरूपातच राहणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाव नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत व प्रशिक्षण यशस्वी करण्याच्या संदर्भाने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे काम शिक्षण उपसंचालक विकास गरड, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. सोनवणे, विषय सहाय्यक अभिनव भोसले काम पाहत आहेत. राज्यातील इतक्या मोठ्या प्रमाणावरत ऑनलाईन प्रशिक्षण करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाला यश मिळाल्याने यापुढे राज्यातील अनेक प्रशिक्षणे ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.