गावकरी झाले गुरूजी; या गावात संपकाळात शाळा सुरू

गावकरी झाले गुरूजी; या गावात संपकाळात शाळा सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संप काळातही आदर्शगाव हिवरे बाजार येथील शाळेत ग्रामस्थांकडून अध्यापनाचे काम करण्यात येत आहे. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन व सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य व गावातील सुशिक्षित पालक तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टीम संप सुरू झाल्यापासून अध्यापनाचे काम करत आहेत.

संपूर्ण राज्यभर जुन्या पेन्शन योजनेसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. त्यात प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचाही सहभाग असून सध्याचा कालखंड हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी संप पुकारल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे.

कोविड काळात सुध्दा संपूर्ण देशभर शाळा बंद असताना हिवरे बाजार मध्ये 15 जून ते 15 एप्रिल या शैक्षणिक वर्षात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून ऑफलाईन शाळा सुरू ठेवण्यात आली होती. त्याचाच परिणाम प्राथमिक शाळेतील 24 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत व यशवंत माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 14 विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

ग्रामीण भागात शाळेतील सर्व विद्यार्थी हे शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात त्यांना इतर कुठलीही खासगी क्लासेस वगैरे सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य हे शिक्षकांवर आणि शाळेवरच अवलंबून असते. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थामार्फत प्राथमिक शाळा सकाळी 7.30 ते 11 व माध्यमिक शाळा सकाळी 7.30 ते 12 या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सध्या संपात जे शासकीय कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com