
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी सातव्या वेतन आयोगातील थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे शहरजिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.
यावेळी प्रांत सदस्य प्रा. सुनील सुसरे, नाशिक विभाग प्रमुख शरद दळवी, कार्यवाह प्रा. शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, प्रा. जयंत गायकवाड, पारखे सर, सुदेश छाजलाने, साजिद पठाण, बबन शिंदे आदी उपस्थित होते. शासनाच्या आदेशानुसार अंशदायी पेन्शन योजनेच्या कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगातील फरक रकमेची रोखीने व 2005 पूर्वीच्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात दरवर्षी एक प्रमाणे पाच टप्प्यात वितरित करावे असे शासनाचे आदेश आहेत. आजपर्यंत तीन ते चार टप्पे जमा होणे आवश्यक होते. परंतु आजपर्यंत फक्त एक किंवा काहींना दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे.
तसेच 2005 पूर्वीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा एकच व काहीचा दुसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा झालेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सर्व कर्मचार्यांच्या देय थकीत रकमा, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते तसेच थकीत वैद्यकीय बिले व काही सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर बांधवांची रजा रोखीकरणांची सर्व देयके, दिवाळीपूर्वी ऑक्टोबर 2023 च्या नियमित वेतनाबरोबर अदा करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांनी थकीत बिले देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यास तात्काळ कर्मचार्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. जास्तीत जास्त मार्चच्या शेवटपर्यंत सर्व प्रकारची देयके अदा केली जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
वेतनपथक कार्यालयात व माध्यमिक शिक्षण विभागात कमी कर्मचारी असूनसुद्धा शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतनपथक अधीक्षक रामदास म्हस्के यांनी अनेक प्रकरणे मंजूर करून निकाली काढलेली आहेत. त्याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.