घड्याळ खरेदी प्रक्रीयेवर लेखा परीक्षकाचे ताशेरे

सदिच्छाचे नेते राजू शिंदे यांची माहिती
घड्याळ खरेदी प्रक्रीयेवर लेखा परीक्षकाचे ताशेरे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षक बँकेतील विद्यमान सत्ताधार्‍यांनी सभासदांना घड्याळ भेट देण्याचा निर्णय घेतला. हे घड्याळ खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा गौप्यस्फोट सदिच्छा मंडळाने केला होता. तसेच याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले होते.

त्यानंतर सत्ताधारी मंडळातील रोहोकले गटाने यासंदर्भातील याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली होती. त्याची सुनावणी लवकरच होणार आहे, परंतु तत्पूर्वीच या खरेदी प्रक्रियेवर बँकेच्या लेखापरीक्षकांनीच ताशेरे ओढल्यामुळे ही खरेदी वादाच्या भोवर्‍यात अडकली असल्याची माहिती सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीचे प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी दिली.

बँकेच्या संचालक मंडळाने हितसंबधातून स्थानिक किंवा महाराष्ट्रातील कंपनीच्या डिलरऐवजी तीन निविदा गुजरात राज्यातून भरल्या गेल्या. तसेच नगरच्या सांय दैनिकात जाहीर प्रसिद्ध देवून एक निविदा नगरमधून भरलेली असताना बाहेर राज्यातील निविदा कशी मंजूर केली या मागील गौडबंगाल काय? याचे समाधानकारक बँकेच्या संचालक मंडळाला देता आलेले नाही. घड्याळ खरेदी प्रकरणाची निविदा राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील वर्तमान पत्रात का प्रसिद्ध केली नाही. या निविदेची कात्रणे गुजरात राज्यात संबंधीत कंपनीपर्यंत पोहचवणारे महान संचालक कोण? त्यांच्या समवेत पोरबंदरची वारी करणारे नेते कोण याची खमंग चर्चा निवडणुकीच्या रणधुमाळीत सभासंदामध्ये रंगताना दिसत आहे.

17 डिसेंबर 2019 च्या संचालक बैठकीतील ठराव क्रंमाक 21 अन्वये ही घड्याळ खरेदी निविदा मंजूर करण्यात आली. कंपनीचा प्रतिनिधी दर निश्चितीसाठी हजर नसताना केवळ कंपनीने पाठवलेल्या ई-मेलवर घड्याळ किंमत ठरवणेत आल. त्यात 72 लाख रक्कम कंपनीला आगाऊ देण्यात आली. घड्याळे ताब्यात मिळण्यापूर्वीच सहा महिने अगोदर रक्कम देण्यासाठी संचालक मंडळ का मेहरबान झाले असेल ? असा प्रश्न लेखा परिक्षणात उपस्थित करणेत आला आहे. अशा या बेताल प्रवृत्तीच्या सत्ताधारी मंडळाला सभासद घरचा रस्ता दाखवतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षक बँकेची घड्याळ खरेदी पारदर्शकच

चेअरमन किसनराव खेमनर यांची माहिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त सभासदांना दिलेल्या घड्याळ खरेदीमध्ये पूर्ण पारदर्शकता असून बँकेने सभासदांना दिलेले घड्याळ दर्जेदार कंपनीचे आहे. त्याची खरेदी किंमत आणि बाजारातील किंमत याची तुलना करता बँकेने थेट कंपनीमार्फत अत्यंत माफक दरामध्ये घड्याळ खरेदी करून ती सभासदांना दिली आहेत. घड्याळ खरेदीबाबत विरोधकांकडून केले जाणारे आरोप बिनबुडाचे आहेत असे बँकेचे चेअरमन किसनराव खेमनर यांनी सांगितले.

बँकेने घड्याळ 508 रुपये अधिक जीएसटी 92 या किमतीस खरेदी केले केले असून या किंमतीमध्ये घड्याळावर असलेला लोगो तसेच घड्याळे प्रत्येक शाखेतपर्यंत पोहोच करण्याचा वाहतूक खर्च देखील सामिल आहे. या घड्याळाची ऑनलाईन किंमत 810 रुपये आहे, तसेच किरकोळ खरेदी दर हा 800 रुपये आहे. बँकेने घड्याळे 30 टक्के सुटसह खरेदी केली आहेत. खरेदी केलेले हे घड्याळ नामांकित कंपनीचे असून थेट कंपनीकडूनच खरेदी केल्याने बँकेस त्याचा लाभ झालेला आहे. निविदा या कंपनीला त्यांच्या स्थानिक डीलर मार्फत पोहच झाल्या आहेत. त्यामुळे निविदा कोणत्या पेपरमध्ये आली, यावरून राजकारण करणे योग्य नाही. केवळ बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधक सभासदांची दिशाभूल करत आहेत.

कपोलकल्पित बातम्या देऊन भ्रष्टाचार झाला अशा बातम्या देत आहेत. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी देखील लावलेली होती. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही.खरेदी व्यवहाराच्या कागद पत्रात काही उणिवा राहिल्या म्हणजे भ्रष्टाचार झाला हे म्हणता येणार नाही. ही खरेदी पारदर्शक व घड्याळे दर्जेदारच आहेत. कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची किंमत अगोदर पेड करावी लागते. उधार वस्तू मिळत नाही हे विरोधकांना यांना चांगले माहीत आहे. बँकेला लॉकर घेतले त्यावेळेस सुद्धा पेमेंट अगोदरच केले होते. घड्याळावर बँकेचा लोगो व नाव आहे. त्यामुळे कंपनीने सर्व रक्कम आगाऊ द्यावी लागेल अशी अट ठेवली होती. बँकेने दिलेल्या घड्याळाची किंमत बाजारातील किमतीपेक्षा जास्त असेल किंवा त्याचा दर्जा कमी असेल तर भ्रष्टाचार झाला असे म्हणता येईल, असे ही खेमनर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com