अकोले, संगमनेर, नगर, पारनेरवर विजयाचे गणित

शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अकोले, संगमनेर, नगर, पारनेरवर विजयाचे गणित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी आज रविवार (दि.16) जिल्हाभरातील 30 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी 10 हजार 456 सभासद मतदानाचा हक्क बजावणार असून उद्या सोमवारी (दि.17) मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी दिली.

दरम्यान, शिक्षक बँकेवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी अकोले, संगमनेर, नगर आणि पारनेर तालुक्यातील मतांवर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. या तालुक्यात जो मुसंडी मारणार त्या मंडळाचा विजयाचा मार्ग निवडणुकीत सुकर होणार आहे.

यंदा बँकेसाठी चौरंगी लढत असली तरी प्रचारादरम्यान गुरूकुलवर स्वमंडळाच्या नेत्यांनी गंभीर आरोप करत मंडळाला घराचा आहेर दिला. यामुळे ऐनवेळी गुरूकुलच्या नेत्यांची चांगलीच पंचायत झाली. स्वकियांना केलेल्या आरोपांचे खंडन करावे की विरोधकांना टीका कराची, यात त्यांचा बराच वेळ वाया गेला. तर गुरूमाऊली (रोहकले गट) प्रचारात फारसा सक्रिय दिसला नाही. काही तालुक्यात रोहकले गटाचे नेते मतदारांपर्यंत पोहचले देखील नसल्याची चर्चा शिक्षकांच्या गोटात आहे.

ऐनवेळी सदिच्छा मंडळासोबत बहुजन आघाडीने जाण्याचा निर्णय घेत निवडणुकीत रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे खर्‍याअर्थाने सत्ताधारी गुरूमाऊली 2015 आणि सदिच्छा मंडळात प्रचाराची रंगत पहावयास मिळाली. तर सत्ताधारी गुरूमाऊली तांबे गटाने गुरूकुलसह अन्य मंडळाचे नेते फोड आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. विशेष करून इनकमींगचा तांबे गटाचा हा प्रयोग कोपरगाव, संगमनेर, पाथर्डी आणि राहाता तालुक्यात दिसून आला.

शिक्षक बँकेचे 10 हजार 456 सभासद आहेत. 30 केंद्रांवर मतदान बूथ असून मतदानाची प्रक्रिया पारपडण्यासाठी 450 कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. आज सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रत्येक बुथवर दोन पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच स्ट्राँगरुमला एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच कर्मचार्‍यांचे पथक तैनात असेल. त्यानंतर उद्या नेप्ती रोडवरील अमरज्योत मंगल कार्यालय, या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी 250 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वच शिक्षक मंडळांनी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पुरी यांनी केले आहे.

दुसरीकडे नगरच्या शिक्षक बँकेचे राज्यात नाव आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर प्रचाराची सांगता झाली. सेवानिवृत्त शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, गुरुमाऊली 2015 चे नेते बापूसाहेब तांबे, गुरूकुलचे नेते डॉ. संजय कळमकर आणि ऐनवळी चार मंडळाना एकत्र आणण्याची किमया करणारे राजेंद्र शिंदे यांच्या गटात ही निवडणूक होत आहे. शिक्षक बँकेचे राजकारण नेहमीच शिक्षक सभासदांना जास्ती जास्त कर्ज तेही कमी व्याजदार, तर कायम ठेवीवर जादा व्याज आणि जास्तीचा लाभांश या भोवती फरतांना दिसते. जो मंडळ हे करण्यात यशस्वी ठरतो. शिक्षक सभासद त्यांच्या पारपड्यात आपल्या मताचे दान टाकतांना दिसतो. यामुळे यंदा सत्ताधार्‍यांवर विरोधकांनी केलेले आरोप की सत्ताधार्‍यांनी सभासदांसाठी कमी केलेले व्याजदर यापैकी कोणत्या मुद्द्याला सभासद पसंती देत आपल्या मताचे दान टाकणार हे सोमवारी दुपारी कळणार आहे.

तालुका मतदार

संगमनेर : 1059, नगर : 772, पारनेर : 851, कोपरगाव : 573, श्रीरामपूर : 465, जामखेड : 439, पाथर्डी : 750, राहुरी : 781, शेवगाव : 667, श्रीगोंदा : 955, अकोले : 1018, नेवासा : 908, कर्जत : 687, राहाता (कोपरगाव) : 299, राहाता (श्रीरामपूर) : 240, एकूण मतदार : 10 हजार 464.

समृद्ध वारसा पोहोचला इतिहासात

20 सप्टेंबर 1919 रोजी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना झाली होती. न. चि. वाळिंबे गुरुजी, आ. पा. य. फलके, ग. रा. पोखरकर, ब. द. फटांगरे, स. शि. सोंडकर, दा. र. सुतार गुरुजी, चं. भि. धनवटे, भा. दा. पाटील आदी शिक्षक नेत्यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या सोसायटीचे 1969 मध्ये बँकेत रुपांतर झाले. त्यानंतर तब्बल 35-36 वर्षे ही बँक सदिच्छा मंडळाच्या ताब्यात होती. मात्र, यातून फुटून बाहेर पडलेल्या गुरुकुलने 2005 मध्ये सत्ता मिळवली. पण ती त्यांना टिकवता आली नाही. 2010 मध्ये पुन्हा सदिच्छा मंडळ सत्तेवर आले. त्यांनाही पुन्हा भक्कमपणे उभे राहता आले नाही व त्यांच्यातील फुटलेल्यांनी गुरुमाऊली मंडळ स्थापून 2015 मध्ये सत्ता मिळवली. सुमारे सात वर्षांच्या त्यांच्या या सत्ताकाळात या मंडळाचीही शकले उडाली व त्यांच्यात रोहोकले-तांबे असे दोन गट झाले. पहिल्या रोहोकलेंच्या सत्तेत साडेतीन वर्षे अध्यक्षपद एकाकडेच होते, पण नंतरच्या टप्प्यातील तांबे गटाच्या सत्तेत अध्यक्ष-उपाध्यक्षपदे 3-3 महिन्यांसाठी वाटली गेली. आता पुन्हा तांबे गटासमोर सत्ता राखण्याचे आवाहन आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com