शिक्षकांच्या बदल्याची घिसडघाई
सार्वमत

शिक्षकांच्या बदल्याची घिसडघाई

सीईओंचे गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र : चार दिवसांत शिक्षकांची माहिती सादर करा

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्याचे आदेश 31 जुलैपूर्वी करण्याचे आदेश दिल्यानंतर प्राथमिक शिक्षकांची एकच धावपळ उडाली आहे. जिल्ह्यातील 11 हजार 500 शिक्षकांपैकी बदली पात्र शिक्षकांची बिनचूक माहिती येत्या 21 जुलैपर्यंत विहित नमुन्यात सायंकाळी पाचपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी काढले आहेत. वेळेवर अचूक माहिती न आल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत आदेश मिळाले आहेत. त्यानुसार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या या ऑनलाईन पध्दतीने न करता त्या ऑफलाईन पध्दतीने 31 जुलैपूर्वी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील बदलीपात्र शिक्षक यातून अधिकार प्राप्त शिक्षक आणि संवर्ग-1, संवर्ग-2 मध्ये बदलीसाठी पात्र असणार्‍या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेने चार दिवसांत म्हणजेच 21 जुलैला सायंकाळी पाचपर्यंत विहित नमुना आणि मुदतीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेळेवर माहिती सादर न करणार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक- उपाध्यापक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यातून बदली पात्र शिक्षकांची माहिती मागवली असून यात संबंधितांचा तालुका, शाळा, शिक्षकांचे नाव, पदनाम, पद्वीधरचा विषय, जन्म तारीख, मूळ पदावरील सेवा दिनांक, आतापर्यंतची सलग सेवा, विद्यमान शाळेतील सलग सेवा, अवघड क्षेत्रात यापूर्वी काम केलेले आहे की नाही, दीर्घ रजा वगळता अवघड क्षेत्रात केलेले काम, विशेष सेवा वर्ग याची तपशीलवार माहिती मागवली आहे.

बदली पात्र शिक्षकांची माहिती पाठविण्यासाठी अवघा चार दिवसांचा कालावधी असल्याने आणि सध्या करोना संसर्गाचा हाहाकार असल्याने अशा परिस्थितीत तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकार्‍यांना 11 हजार 500 शिक्षकांमधून अचूक बदली पात्र शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेला सादर करावी लागणार आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यामध्ये संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये विशेष सवलत असते. यातील पहिल्या संवर्गात पक्षाघात, अपंग, हृदय शस्त्रक्रिया झालेले, एकच किडनी असणारे, कॅन्सरग्रस्त, आजी-माजी सैनिक- अर्ध सैनिक जवान पत्नी, विधवा, कुमारीका, घटस्फोटीत, 53 वर्षांपेक्षा अधिक वय, मेंदू विकार यांचा समावेश आहे. तर संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, 30 किलो मीटरपेक्षा अधिक अंतर, दोघांपैकी अन्य शासकीय सेवेत असणारे शिक्षक यांचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com