आता शिक्षक बदल्या ‘या’ पद्धतीने
सार्वमत

आता शिक्षक बदल्या ‘या’ पद्धतीने

31 जुलैपूर्वी कराव्या लागणार बदल्या

Arvind Arkhade

संगमनेर|वार्ताहर|Sangmner

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार किंवा नाही यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, ग्रामविकास विभागाच्यावतीने यावर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन स्वरूपात करण्याचे आदेश दिले आहेत. 31 जुलैपर्यंत या बदल्या करावयाच्या असून केवळ 15 टक्के बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाईन करण्यात येत होत्या. त्यानंतर राज्यभर विविध संघटनांनी आघाडीच्या सरकारला निवेदने देऊन बदल्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे विनंती केली होती. त्यानंतर राज्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच मुख्य अधिकार्‍यांची समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यासंदर्भात शासन निर्णय बाहेर पडू शकलेला नाही. तथापि सध्या करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभागातून 15 टक्के बदल्या करण्याचे आदेश दिले होते.

ग्रामविकास विभागाने मागील आठवड्यात प्राथमिक शिक्षक वगळता सर्व विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. तथापि बुधवारी सायंकाळी ग्रामविकास विभागाच्यावतीने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरच्या बदल्या करताना यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या आदेशाचे आदिवासी विकास, सामाजिक न्याय, पालन करावयाचे असून, ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे व वेळोवेळी या शासन निर्णयाला पूरक म्हणून शासन निर्णय काढण्यात आले आहेत.

त्या सर्व शासन निर्णयाच्या अनुषंगाने बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी ऑनलाईन न होता ऑफलाईन करण्याचे आदेश मिळाल्याने पंंचायत समितीमध्ये यापुढे अर्ज स्वीकृतीसाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोव्हिड 19 संदर्भाने देण्यात आलेले मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अर्ज घेण्याच्यावेळी सामाजिक अंतर पाळण्याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा अंतर्गत होणार्‍या बदल्या व आंतरजिल्हा बदल्या या पंधरा टक्केपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे. ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया केवळ या एका वर्षापुरती अधिक्रमित करण्यात आली आहे.

एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात बदली करवून घेण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येते. यापूर्वी शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. बदली प्रक्रिया गतीने होण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदरच्या बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या बिंदुनामावली मागासवर्ग कक्ष करून तपासून त्या एनआयसी पुणे यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी समन्वक म्हणून नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी काम पहात असले, तरी आंतरजिल्हा बदल्यांच्या अनुषंगाने इतर कामांसाठी जिल्हा परिषद पुणे व चंद्रपूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहकार्य करायचे असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com