शिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या
सार्वमत

शिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या

आ. नीलेश लंके यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांना यश

Arvind Arkhade

सुपा|वार्ताहर|Supa

राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्य शासनाच्यावतीने सद्यस्थितीत कोव्हिड 19 प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदल्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारी शिक्षकांची संभाव्य गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने विचार करून वरील आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने काढण्यात आला आहे.

शिक्षकांच्या ऑफलाईन पद्धतीने सर्व प्रकारच्या बदल्या करण्याबाबत आदेश 15 जुलै रोजी काढला होता. कोव्हिड पार्श्वभूमिवर प्रशासकीय बदल्या करणे योग्य नसून फक्त विनंतीच बदल्या शासनाने कराव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने आमदार निलेश लंके यांच्याकडे करून याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

आ. लंके यांनी शिक्षकांच्या या मागणीचा विचार करून यावर्षी कोव्हिड पार्श्वभूमिवर फक्त विनंतीच बदल्या करण्यात याव्यात. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून दोन वेळा चर्चा करून राज्यातील शिक्षकांच्या विनंती बदल्यांचा आदेश शासनाने काढावा, अशी विनंती व पाठपुरावा केला होता.

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात आ. लंके यांच्या पाठपुराव्याला यश येऊन प्रशासकीय बदल्यांचा खो यावर्षी रद्द करून फक्त विनंती बदल्या समुपदेशनाने करण्याबाबतचे आदेश बुधवारी शासनाने काढले आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

विनंती बदल्यांचा आदेश निघाल्याने शिक्षकांच्या यावर्षी गैरसोयी होणार नाहीत, अशी चर्चा शिक्षक वर्तुळात होत असून शासनाच्या या निर्णयाचे शिक्षकांनी स्वागत केले आहे. दरम्यान राज्यातील शिक्षकांच्या संघटनांचे प्रतिनिधीही या आदेशासाठी प्रयत्नशील होते.

विनंती बदल्या केल्याने शिक्षकांच्या गैरसोयी टळतील -आ.निलेश लंके

यावर्षी कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांच्या बदल्या करताना प्रशासकीय बदल्या करणे, शिक्षकांच्यादृष्टीने गैरसोयीचे ठरले असते. शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या केल्याने ज्यांना गरज आहे, जे गैरसोयीने आहेत. त्यांच्याच बदल्या झाल्याचे योग्य राहील, ही भूमिका शिक्षकांनी केलेल्या मागणीनुसार शासनाकडे मांडल्याने आणि ती मान्य केल्याने अनेक शिक्षकांच्या गैरसोयी टळतील व जे गैरसोयीने आहेत त्यांची सोय होईल, असे आमदार निलेश लंके म्हणाले.

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात आमदार निलेश लंके यांनी शिक्षकांच्या संभाव्य गैरसोयी टाळण्याबाबत शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने विनंती बदलीचा आदेश निघाल्याने राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील शिक्षकांच्यावतीने ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ व आ. निलेश लंके यांचे ऋण व आभार व्यक्त करत आहोत.

- कारभारी बाबर, अध्यक्ष, पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com