
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी सोमवारपासून (दि.13) बदली पात्र शिक्षकांना प्रोफाईल अपडेट करता येणार आहे. यासाठी सात दिवसांचा कालावधी असून 20 जूनपर्यंत शिक्षकांना स्वत:ची माहिती स्वत:च्या मोबाईलवरून बदलीसाठी तयार करण्यात आलेल्या संकेत स्थळावर टाकता येणार आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या शिक्षकांच्या यादीनूसार जिल्ह्यात यंदा 1 हजार ते 1 हजार 200 प्राथमिक शिक्षक बदलीसाठी पात्र असल्याचा अंदाज शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षण विभागाने बदलीपात्र शिक्षकांची सर्व माहिती यापूर्वीच ग्रामविकास विभागाला सादर केलेली आहे. त्यानंतर राज्य पातळीवरून शिक्षकांच्या बदलीसाठी नवीन प्रणाली विकसीत करण्यात आलेली असून मागील 15 दिवसांपूर्वी त्याची रंगीत तालमीही घेण्यात आलेली आहे. गुरूवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यंदा बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील शाळा फायनल झालेल्या नाहीत.
यामुळे मागील वर्षी अवघड क्षेत्रात असणार्या शाळांच्या यादीच्या आधारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्हांतर्गत बदली करतांना ज्या शिक्षकांचे सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा शिक्षकांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. बदली पात्र शिक्षकांना 30 शाळांचा पसंती क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षीका, कुमारिका शिक्षक, परित्याक्त्या शिक्षक, घटस्फोटीत महिला शिक्षक त्याच प्रमाणे व्याधिग्रस्त शिक्षकांसोबतच पती-पत्नी एकत्रिकरण आदी विशेष संवर्गाती शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे. यंदा सहा टप्प्यात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
यानूसार शिक्षकांना स्वत:च्या प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सोमवार (दि.13) पासून मुदत देण्यात आली असून ही मुदत 20 तारखेपर्यंत आहे. यात संंबंधीत शिक्षकांना स्वत:चे नाव, व्यक्तिगत माहिती बरोबर आहे की नाही याची दुरूस्ती करता येणार आहे. तसेच आधार क्रमांक, पॅनकार्ड, जन्म तारिख, विद्यमान नियुक्तीचे ठिकाण आणि सेवाविषय माहिती अपडेट करता येणार आहे. स्वत:च्या रजिष्टर मोबाईलवरून ओटीपीच्या सहाय्याने ही माहिती अपडेट करता येणार आहे. दुरूस्ती केलेली माहितीला गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तारावर माहिती तपासून त्याला त्याला मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार आहेत. यापूर्वी देखील शिक्षकांच्या बदल्य ऑनलाईन होत होत्या. मात्र, यंदा ग्रामविकास विभागाने नव्याने ऑनलाईन प्रणाली विकसीत केली असून त्यानूसारच शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे बदलीच्या प्रक्रियेत पारदर्शता येणार असली तरी बदल्यासाठी प्रत्यक्षात जुलै महिना उजाडणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सुत्रांनी सांगितले.