शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा मार्ग मोकळा दि. 1 ते 30 जून कालावधीत होणार प्रशिक्षण

शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा मार्ग मोकळा
दि. 1 ते 30 जून कालावधीत होणार प्रशिक्षण

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रशिक्षण कालावधी निश्चित होत नसल्याने संघटनांनी सातत्याने प्रशिक्षणाची मागणी केली होती. अखेर एक जूनपासून राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या संदर्भातील निवेदन परिषदेचे सहसंचालक रमाकांत काटमोरे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यातील सुमारे एक लाख प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक प्रश्न व प्रशिक्षण परिषद या संस्थेवरती निश्चित करण्यात आली होती. गेले काही वर्ष शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण दिले जावे अशी मागणी शिक्षक आमदार, शिक्षक संघटना यांच्या वतीने करण्यात येत होती. प्रशिक्षण न झाल्यामुळे राज्यातील सुमारे एक लाख शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या.

या संदर्भात विधिमंडळातही चर्चा करण्यात आली. अखेर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दोन हजार रुपये प्रशिक्षण खर्च घेऊन प्रशिक्षण कार्यवाही सुरू केली होती. यासाठी समिती गठीत करण्यात आली. अभ्यासक्रमाचे नियोजन, त्याचबरोबर साहित्य निर्मिती यासारख्या कार्यक्रमाचा विचार करता काही कालावधी लागणे शक्य होते. मोठ्या प्रमाणावर काम करून ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन पूर्ण केले आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांचा प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

तीस दिवसांत पूर्ण करावा लागणार अभ्यासक्रम

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठीच्या वतीने इ-कोर्स अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. त्यासाठी ध्वनीचित्रफिती निर्माण करून शिक्षकांना त्या पाहणे, त्या संदर्भातील विचार करणे, त्यानंतर स्वाध्याय, चाचणी सोडून सादर करावे लागणार आहेत. प्रशिक्षण हे पन्नास ते साठ तासांचे असणार आहे. तासिका पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एक जूनला उद्बोधन सत्र

राज्यातील शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभागी होत असताना त्या संदर्भाने शिक्षकांचे उद्बोधन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यवाही व त्या संबंधित प्रक्रिया तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी आल्यास त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेच्यावतीने 1 जून रोजी युट्यूब लाईव्ह सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात आलेले आहे.

वेतनश्रेणीचा मार्ग होणार मोकळा

राज्यातील शिक्षकांना बारा वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी, चोवीस वर्ष सेवेनंतर निवड श्रेणी दिली जाते. 24 वर्षे सेवा झालेल्या एकूण शिक्षकांपैकी केवळ 20 टक्के शिक्षकांना वेतन श्रेणी लाभ दिला जातो. मात्र त्यासाठी शासनाने निर्धारित केलेले निकष पूर्ण करण्याबरोबर प्रशिक्षण अनिवार्य असते. यापूर्वी शासनाने प्रशिक्षणाची गरज असल्याचे सूचित केले होते. मात्र आर्थिक भार पडत असल्याने शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करत विभागाने प्रशिक्षणाची सक्ती केली होती. प्रशिक्षण आदेश आल्यानंतर प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करणे, प्रशिक्षण देणे यासारखी कारवाई करण्याच्यादृष्टीने परिषदेने प्रयत्न केले. अखेर त्याला यश आल्याने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून शिक्षकांना वेतन लाभ मिळणे आता शक्यही होणार आहे. राज्यातील सुमारे एक लाख शिक्षक या प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com