गुरूजी, विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरील शिक्षणाचा ‘लळा’
सार्वमत

गुरूजी, विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरील शिक्षणाचा ‘लळा’

शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये सगळे कागदावरच ‘अ‍ॅक्टिव्ह’ ?

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात शाळेसह सर्वकाही लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, गेल्या महिन्यापासून शाळा सोडून अन्य सेक्टर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशानुसार जिल्हाभर जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका आणि अन्य आस्थापनेतील सर्वच शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास घेतात का? याचा आढावा जिल्हा परिषदेने घेतला आहे.

यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 90 टक्के शिक्षक म्हणजेच 10 हजार 338 आणि 1 लाख 32 हजार 953 विद्यार्थी हे व्हॉट्सअ‍ॅप गु्रप, दिशा अ‍ॅप, ऑनलाईन शिकवणीचा आनंद घेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक ऑनलाईन अध्यापनात कागदावरच अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात करोनामुळे सर्वच माध्यमाच्या शाळा बंद आहेत. या काळातही पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद आणि राज्य सरकारने दिले. त्यानुसार गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील शाळांतील शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचे काय केले, याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी मागवला होता.

यात ऑनलाईन वर्ग घेताना किती शिक्षक झूम किंवा गुगल मीट वापरतात, किती शिक्षक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, दीक्षा अ‍ॅप, लिंक व्हीडिओ किंवा ऑनलाईन टेस्टद्वारे अध्यापन करतात? ऑनलाईन शक्य नाही तेथे आठ-पंधरा दिवसांचा अभ्यास लिहून (हार्डकॉपी) मुलांना दिला का? विद्यार्थी-पालक यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रम दिला का? प्रत्यक्ष शाळेत जाऊन थोड्या मुलांचे गट करून अध्यापन केले का? स्वयंसेवकांद्वारे अध्यापन सुरू आहे का किंवा यापैकी कोणत्याही प्रकारे अध्यापन करत नसणारे शिक्षक आहेत का? याचा शाळानिहाय, तालुकानिहाय शिक्षक आणि विद्यार्थी संख्येसह तपशील सीईओंनी मागवला असून तो प्रत्येक गटविकास अधिकार्‍याने दर सोमवारी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाला पाठविण्यात येत आहे.

याबाबतचा 13 ते 20 जुलै या आठ दिवसांच्या कालावधीचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. यात ही माहिती दोन प्रकारे प्राप्त झाली आहे. पहिल्या भागात केवळ जिल्हा परिषद शाळांचा आढावा तर दुसर्‍या भागात इतर व्यवस्थापन म्हणजे नगरपालिका, नगरपंचायतच्या शाळा, तसेच खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत एकूण 31 हजार 823 शिक्षक आहेत, तर बारावीपर्यंतची पटसंख्या 8 लाख 4 हजार 262 एवढी आहे. यात जवळपास सर्वच शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईन कार्यरत असल्याचे आढाव्यावरून दिसते आहे. जिल्हा परिषद शाळांचे 38 व इतर व्यवस्थापन शाळांचे 94 असे एकूण 132 शिक्षक कोणत्याचप्रकारे अध्यापन करत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा गोषवारा

ऑनलाईन वर्ग (झूम, गुगल मीट) 6304 (झेडपी), 72166 (अन्य व्यवस्थापन). व्हॉट्सअ‍ॅप, दीक्षा ग्रुपवर अध्ययन 1 लाख 32 हजार 953 (झेडपी) 3 लाख 82 हजार 872(अन्य व्यवस्थापन). लिहून हार्डकॉपीद्वारे अध्ययन 24 हजार 241 (झेडपी) 65 हजार 650 ((अन्य व्यवस्थापन). फोनद्वारे अभ्यास 57 हजार 245, 1लाख 14 हजार 415 (अन्य व्यवस्थापन). शाळेत येऊन थोड्या मुलांना अध्ययन 1 हजार 940 (झेडपी) 3 हजार 385 (अन्य व्यवस्थापन). स्वयंसेवकाद्वारे अध्ययन 905 (झेडपी), 4 हजार 845 (अन्य व्यवस्थापन). कोणतेही शिक्षण सुरू नसलेले विद्यार्थी 12 हजार 956 (झेडपी) 45 हजार 953 (अन्य व्यवस्थापन).

झुम अ‍ॅप आणि गुगल मिट 820 शिक्षक 6.92 टक्के, व्हॉट्सअ‍ॅप लिंक-दिशा अ‍ॅप 10 हजार 338 शिक्षक 9 0.42 टक्के, 8 दिवस ते महिनाभराचा अभ्यास देणारे 2 हजार 211 शिक्षक, 19.34 टक्के. फोनव्दारे अभ्यापन करणारे 5 हजार 789 शिक्षक, 50.63 टक्के. प्रत्यक्षात शाळेत जाऊन गट करून अध्यापन करणारे 311, 2.72 टक्के. कोणत्याही प्रकारे अध्यापन न करणारे 38 शिक्षक, 0.33 टक्के आणि स्वयंसेवकांव्दारे सुरू असणारे 60 शिक्षक, 0.52 टक्के आहे.

ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी कोणतेही शिक्षण घेत नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात 58 हजार 909 आहे. त्यात जिल्हा परिषदेचे 12 हजार 956, तर इतर व्यवस्थापन शाळांचे 45 हजार 953 विद्यार्थी आहेत. शाळा सुरू नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com