
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सोमवारपासून (दि.13) शाळा सुरू करण्याचे आदेश यापूर्वीच शासनाने दिले आहेत. तथापि, त्या आदेशात बदल करून, सोमवारी व मंगळवारी शाळेत शिक्षक, कर्मचार्यांनी येऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात बुधवारपासून (ता. 15) येणार आहेत. दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी शाळा पूर्व तयारी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
मागील आठवडाभरात मुंबईसह राज्यात काही भागात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अॅलर्ट राहण्याचे आदेश सरकारने दिले. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छता, सर्व वर्गांमध्ये करोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे नियोजन, शिक्षकांची कोविड तपासणी, मास्कचे नियोजन, अशा विविध उपाययोजना करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू होतील, परंतु विद्यार्थी त्या दिवशी येणार नाहीत. संपूर्ण तयारी झाल्यानंतर बुधवारी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा जोमाने शाळा भरणार आहेत. मागील वर्षी काही दिवस शाळा सुरू होत्या. मात्र, करोनाचे संकट वाढल्यानंतर पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ आली होती. यंदा परिस्थिती नियंत्रणात असून शिक्षक आणि 12 वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असले तरी वाढत्या करोना रुग्ण संख्येमुळे सरकार पातळीवरून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुन्हा शाळा भरणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके उपलब्ध होणार आहे. तसेच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आले असून शिक्षकांनी देखील शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वी तयारी करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
बाजारात खरेदीसाठी गर्दी
शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्याने बाजारपेठेत कपडे, शूज, शालेय साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मात्र विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच करोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दुकानांमध्ये सक्ती करण्याची गरज असल्याचे पालकांमधून सांगितले जात आहे. नगरच्या बाजारपेठे स्कूल बॅग, वह्या, पाण्याची बाटल्या, विद्यार्थ्यांसाठी मास्क, यासह अनुषंघिक शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी होतांना दिसत आहे.