शिक्षक पदासाठी संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याची मागणी

शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदन
शिक्षक पदासाठी संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्ग पदासाठी संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठविले असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदे शासन निर्णय दि. 28 ऑगस्ट 2015 अन्वये मंजूर करण्यात येत आहे.

या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.1 ते 2.3 वरील तरतुदी सुधारित करण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने उपरोक्त संदर्भान्वये नवे निकष प्रस्तावित केले आहेत. शासन निर्णय दि. 28 ऑगस्ट 2015 मधील निकष इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते दहावीमधील एकूण विद्यार्थी संख्येवर आधारित आहे.

तसे शिक्षण आयुक्तालयाने प्रस्तावित केलेले निकष इयत्ता पहिली ते चौथी/पाचवी, सहावी ते आठवी, पाचवी ते दहावी, आठवी ते दहावी मधील एकूण संख्येवर आधारित आहेत.

भिन्न इयत्तेमधील एकूण विद्यार्थी संख्येच्या निकषावर शिक्षक संवर्गातील पदे मंजूर करणे अशैक्षणिक आहे. कारण शैक्षणिक प्रक्रिया इयत्तानिहाय अमलात आणली जाते. त्यामुळे शिक्षक संवर्गातील पदे इयत्तानिहाय विद्यार्थी संख्येवर मंजूर करणे अत्यावश्यक, घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. त्याशिवाय बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com