‘गुगल क्लासरूम’मध्ये साडेतीन हजार शिक्षक घेणार धडे

ऑनलाईन प्रशिक्षण : पहिले ते बारावीपर्यंत शिक्षकांची निवड
‘गुगल क्लासरूम’मध्ये साडेतीन हजार शिक्षक घेणार धडे

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

गुगल मीट, झूम अ‍ॅप, तसेच गुगल क्लासरूम आदी ई-माध्यमातून इंग्रजी शाळांनी ऑनलाईन शिक्षणात आघाडी घेतली आहे. या ऑनलाईन शिक्षणात मराठी माध्यमाचे विद्यार्थी मागे पडू नयेत म्हणून शालेय शिक्षण विभागानेही पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. यात राज्यातून 1 लाख 18 हजार शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यून जिल्ह्यातील 3 हजार 596 शिक्षकांचा या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

करोनाच्या संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. त्यांच्याकडून सध्याही शिक्षणमाला सुरू असून रोज त्यात विद्यार्थ्यांसाठी ई-कंटेण्ट दिला जातो. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी परिषदेमार्फत सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गुगल क्लासरूम ही सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

गुगल क्लासरूमच्या वतीने राज्यभरातील सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 13 जुलैपर्यंत शिक्षकांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. त्यात राज्यभरातून 1 लाख 18 हजार शिक्षकांनी नोंदणी केली. त्यात नगर जिल्ह्यातील 3 हजार 596 शिक्षकांचा समावेश आहे. हे शिक्षक प्रशिक्षित झाल्यानंतर इतर शिक्षकांना प्रशिक्षित करतील. नंतर विद्यार्थ्यांसाठी गुगल क्लासरूमच्या माध्यमातून ऑनलाईन धडे द्यायचे आहेत.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून हे गुगल क्लासरुम प्रशिक्षण आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील याच धर्तीवर जिल्ह्यासाठी अशी स्वतंत्र योजना राबविण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात खासगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com