शिक्षकांच्या ऑनलाईन अध्यापनाची ‘कुंडली’च झेडपीने मागविली

सीईओ पाटील : ऑनलाईनसह ऑफलाईन अध्यापनाचा तपशील सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश
शिक्षकांच्या ऑनलाईन अध्यापनाची ‘कुंडली’च झेडपीने मागविली

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना संकटामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. यामुळे यंदा जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापन, गुगल- झुमव्दारे मिटींग, दिक्षा अ‍ॅपव्दारे अध्यापन, यासह ज्याठिकाणी शक्य आहे,

तेथे प्रत्यक्ष शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम ठरवून देणे, 8, 15 आणि शक्य झाल्यास 30 दिवसांचा अभ्यासक्रम ठरवून देऊन त्याच्या प्रती विद्यार्थ्यांकडून जमा करणे यासह लॉकडाऊन काळात काहीच कामे न केलेल्या शिक्षकांची कुंडलीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. पाटील यांनी मागविली आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे विद्यमान परिस्थितीनुसार 31 जुलैपर्यंत कोणत्याच शाळा सुरू होणार नाहीत. प्राथमिक शाळा सुरू होण्यास बराच कालावधी लागणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिक्षक, प्राध्यापक यांनी शाळेत येऊन ई- लर्निंग साहित्य यासह ऑनलाईन अभ्यासक्रम, व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, गुगल झुमव्दारे मिटींग, दिक्षा अ‍ॅपव्दारे अध्यापन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

त्यानुसार गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पहिले आठवी आणि प्राथमिक शाळेतील, तसेच मनपा शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचे काम केले. तसेच ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या किती शिक्षक शाळेत गेले, त्यांनी विद्यार्थ्यांना 8, 15 आणि शक्य झाल्यास 30 दिवसांचा अभ्यासक्रम ठरवून देत तो विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतला का? ऑनलाईन शिक्षणात किती विद्यार्थी कार्यरत आहेत, किती शिक्षकांनी ऑनलाईन मिटींग, तासिका, विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेतली,

विद्यार्थी-पालक यांच्यासाबेत फोन अथवा मोबाईलव्दारे संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रम दिला यांचा शाळानिहाय, तालुकानिहाय शिक्षक आणि विद्यार्थी संख्येसह तपशील मागितला आहे. याबाबत प्रत्येक गटविकास अधिकार्‍यांना पत्र देऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापनाची कुंडलीच मागविण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत ही माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी सांगितले.

तसेच ज्या शिक्षकांनी लॉकडाऊन काळात काहीच केलेले नाही, याची आकडेवारी देखील मागविण्यात आली असल्याने दिवसभर आराम करणारे शिक्षक देखील आता समोर येणार आहेत. त्यावर जिल्हा परिषद काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com