शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी होणार गोड

28 टक्के महागाई भत्ता व 9 टक्के घरभाडे वाढ लागू
शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी होणार गोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 28 टक्के महागाई भत्ता व 9 टक्के घरभाडे वाढ लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिक्षक परिषदेने या मागणीसाठी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. वाढीव घरभाडे भत्ता व वाढीव महागाई भत्त्याची फरकासह ऑक्टोबरचे नियमित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार आहे. यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.

घरभाडे भत्ता वाढ देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 1 जुलै 2021 पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28 टक्के एवढा झालेला असून महागाई भत्त्याची 25 टक्केची मर्यादा पार झालेली असताना 27, 18 आणि 9 टक्के दराने घर भाडे वाढ देण्याबाबत शासनाने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षक परिषदने पाठपुरावा केला होता. तसेच महागाई भत्त्याच्या फरकासह दिवाळीपुर्वी वेतन मिळण्याच्या मागणीचे निवेदन वेतनपथक अधिक्षकांना देण्यात आले होते.

1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतचा पाच महिन्यांचा महागाई भत्ता फरकासह वाढीव घरभाडे भत्ता ऑक्टोबरचे नियमित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार असल्यने शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होणार आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतनपथक अधिक्षक स्वाती हवेले यांनी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे देखील शिक्षक परिषदेच्या वतीने आभार माण्यात आले आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, बाबासाहेब बोडखे, बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर, प्रा. सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी सदस्यांनी पाठपुरावा केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com