शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणास आणखी वर्षभर प्रतीक्षा : पालकमंत्री
सार्वमत

शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणास आणखी वर्षभर प्रतीक्षा : पालकमंत्री

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

पती-पत्नी एकत्रीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गुरुजींना आता पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या एकत्रीकरणाच्या बदल्या पुढील वर्षी करण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यांतर्गत, बाहेरून जिल्ह्यात येऊ इच्छिणारे आणि एकल शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात बर्‍याच तक्रारी आल्या होत्या. या सर्वांचा विचार करून पाच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा समावेश असलेला एक अभ्यासगट नियुक्त करण्यात आला होता. त्यांनी सर्व परिस्थितीची माहिती घेऊन, अभ्यास करून एक अहवालही सादर केला. मात्र त्याचवेळी करोनाचा कहर सुरू झाल्याने त्यावर कोणताही निर्णय घेता आला नाही.

तसेच त्या अहवालानुसार बदल्यांसाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचे होते, ते देखील होऊ शकले नाही. जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी सॉफ्टवेअर नाही. ही सर्व पूर्तता करूनच ऑनलाईन बदल्या करण्यात येणार आहे. त्यामुळे पती-पत्नी एकत्रीकरण आणि इतर बदल्या पुढील वर्षी करण्यात येतील. अनेक वर्षांपासून पती-पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत.

काही एकल शिक्षक देखील आपल्या घरापासून दूरवर काम करीत आहेत. त्यांना घराजवळ आणणे, पती-पत्नी एकत्रीकरण करून आनंददायी शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पुढील वर्षी हे पूर्ण करण्यात येईल. असे असले तरी कोकणात असलेल्या शिक्षकांना लगेच इकडे आणता येणार नाही. कोकणात शिक्षकांची संख्या कमी आहे. तेथे विशेष मोहिमेद्वारे शिक्षकांची भरती करून संख्या वाढविली जाईल, नंतरच तेथील शिक्षक इकडे आणू.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com