शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
सार्वमत

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

अवघे सोळा हजार विद्यार्थी पास

Arvind Arkhade

संगमनेर|वार्ताहर|Sangmner

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर काल संध्याकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले.

गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल www.mahatet.in या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.

19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन्ही पेपर करीता राज्यभरातून 3 लाख 43 हजार 242 उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील 1 हजार 44 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत शेकडो चुका निघाल्याने परिषदेच्या कामावर टीका करण्यात आली होती. अखेर यातून मार्ग काढत बुधवारी निकाल जाहीर केला आहे.

टीईटीच्या पेपर एकसाठी (इयत्ता 1 ली ते 5 वी गट), 1 लाख 88 हजार 688 पैकी 10 हजार 487 जण पात्र झाले आहेत. तर पेपर दोनसाठी (इयत्ता 6 वी ते 8 वी गट) 1 लाख 54 हजार 596 परीक्षार्थींपैकी 6 हजार 105 जण पात्र झाले आहेत. आत्तापर्यंतच्या सहा परीक्षांमध्ये राज्यभरातील 86 हजार 298 शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहे. या परीक्षेच्या निकालाबाबत आरक्षण, वैकल्पिक विषय, अपंगत्व यासह इतर सुविधांचा लाभ मिळाला नसल्यास 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन तक्रार पुराव्यासह करावी, असे आवाहन परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2013 पासून ‘टीईटी’चे आयोजित केले जाते. आत्तापर्यंत 2016 वगळता इतर वर्षी परीक्षा झाली आहे.2019 ची परीक्षा 10 जानेवारी 2020 रोजी झाली होती.

वर्ष आणि पात्र शिक्षक

2013 - 31072

2014 - 9595

2015 - 8989

2017 - 10373

2018 - 9677

2019 - 16582.

अनेकांना मिळणार आधार

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण त्यामुळे सेवेत असलेल्या अनेक शिक्षकांना सेवेतून कमी करण्यासंदर्भात यापूर्वी राज्य शासनाने आदेश दिले होते. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लागल्याने अनेकांना आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com