शिक्षकांनी दिली गावातील गरीब व निराधार महिलांना दिवाळीची भेट

शिक्षकांनी दिली गावातील गरीब व निराधार महिलांना दिवाळीची भेट

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी अंतर्गत असलेल्या घोरपडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी येथील निराधार व वृद्ध महिलांना दिवाळीनिमित्त स्वखर्चातून साडीचोळीची भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवण देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

नुकताच राज्यस्तरीय स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त आदिवासी बहुल घोरपडवाडी शाळेतील मुख्याध्यापक खंडू भुजबळ आणि त्यांचे सहकारी रमेश खरबस यांनी या वाडीत राहणार्‍या निराधार व वृद्ध महिलांना स्वखर्चातून दिवाळीची भेट दिली. साडी, चोळी आणि गोड पदार्थ भेट देऊन निराधार व वृद्ध महिलांच्या चेहर्‍यावर हसू फुलविले.

आदिवासी बहुल छोट्याखाणी घोरपडवाडी जिल्हा परिषद शाळेत तब्बल 34 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील या उपक्रमशील शिक्षकांनी या शाळेचा चेहरा मोहरा बदलत चुणचुणीत विद्यार्थी, अंतर्बाह्य बोलक्या भिंती व स्वच्छ शाळा आणि शालेय परिसरात फुलविलेली झाडी यामुळे येथील वातावरण शैक्षणिक दृष्ट्या आनंददायी व चैतन्यदायी केले आहे. विद्यार्थी केंद्रभूत ठेवून पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा शिक्षणाबाबत योग्य समन्वय या शिक्षकांनी साधला असून शालेय कामकाजाव्यतिरिक्त गावातील सुख दुःखातही हे दोन्हीही शिक्षक नेहमी आवर्जून सहभागी होतात.

शाळेच्या प्रांगणात फुलविलेली वृक्षराजी, बोलक्या भिंती, परसबाग, तुळशीचा ऑक्सिजन पार्क, शालेय गुणवत्ता, स्वच्छ शाळा, विविध उपक्रम यामुळे शाळेला एक वेगळी ओळख निर्माण करून देणार्‍या या दोन्ही शिक्षकांचा घोरपडवाडी गावाने सन्मानपत्र देऊन गौरवही केलेला आहे.

शाळेला दिवाळीची सुट्टी लागण्याच्या आदल्या दिवशी या शिक्षकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना गोड जेवण देत आणि गरीब निराधार व वृद्ध महिलांना दिवाळीनिमित्त साडीचोळीची भेट दिली. या अगोदरही करोना काळात या दोन शिक्षकांनी येथील गरीब व निराधार कुटुंबांना किराणा देऊन मदत केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com