गुरूजींनी दिली कोव्हिड सेंटरला पाच लाखांची भरीव मदत

सभापती घुले : शिक्षकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद
गुरूजींनी दिली कोव्हिड सेंटरला पाच लाखांची भरीव मदत
संग्रहित

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या संकटात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून कोव्हिड सेंटरसाठी

चार दिवसांत (रविवार दि. 18 पर्यंत ) स्वयंप्रेरणेने सुमारे पाच लाख रुपयांचा भरीव निधी संकलित करून आदर्शवत कार्य केले आहे. फक्त प्रसिध्दीसाठीची पळापळ थांबवून अनेकांनी यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

संकटकाळी सर्वसामान्यांसाठी जो धावतो तोच खरा समाजाचा तारणहार असतो. करोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद व स्तुत्य असल्याचे कौतुक पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असताना गोरगरिब रुग्णांना व गंभीर रुग्णांना शेवगावच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार दिले जात आहेत.

उपचाराच्या विविध उपाययोजना करताना अडचणी येत असल्याचे लक्षात घेता तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी मदतीचे दानशुरांना आवाहन केले होते. याला प्राथमिक शिक्षकांनी प्रतिसाद देत गुरूवारपासून स्वेच्छेने मदत निधी जमा करण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर केलेल्या आवाहनास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

शेवगावच्या उपक्रमाचे गुरूकुलचे शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, शिक्षक परिषद तथा गुरूमाऊली मंडळाचे नेते रावसाहेब रोहकले, शिक्षकनेते राजेंद्र जायभाये, सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, शिक्षक संघाचे नेते राजू शिंदे, अनिल आंधळे, सचिन नाबदे आदींनी स्वागत केले. राज्यातील शिक्षक करोना संकट काळात सामाजिक उत्तरदायित्व निभावत असून शेवगावमधील हा उपक्रम जिल्हा व राज्याला मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज, शिष्यवृत्ती परीक्षा, स्वाध्याय व ऑनलाईन शिक्षणातही काम अतिशय चांगले आहे. करोना संकटात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने कोव्हिड सेंटरसाठी भरीव मदत जमा करून आदर्शवत काम केले आहे. या पवित्र कार्याला मी पाच हजार एक रुपयांची मदत केली आहे.

- रामनाथ कराड, गटशिक्षणाधिकारी, शेवगाव

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com