अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेची पायरी चढणार आहेत. करोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली

शाळा व कॉलेज सोमवार (दि.23) पासून सुरू होणार आहेत. सुरूवातीला राज्यातील केवळ 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी शासकीय यंत्रणे मार्फत याठिकाणी अध्यापन करणार्या शिक्षकांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशा 2 हजार 200 शिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

करोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. आता सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून सोमवारपासून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग जोमाने काम करत आहे.

सध्या सुरू होणार्या संबंधित शाळा निर्जंतूक करणे, तापमान मापक उपलब्ध करून देणे अशा जबाबदार्याही स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी माध्यमिक शिक्षकांची करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, करोनचा प्रादुर्भाव झाला नसल्यांचे स्पष्ट झाल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांची करोना चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यात 9 वी ते 12 वी पर्यंतचे कार्यरत शिक्षकांची संख्या 16 हजारांहून अधिक आहे. या शिक्षकांची गेल्या तीन दिवसांपासून करोनाचा चाचणी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 200 माध्यमिक शिक्षकांची करोना चाचणी पूर्ण झाल्याचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात 9 वी ते 12 वी कार्यरत शिक्षकांची संख्या 16 हजारांहून अधिक असून आतापर्यंत 2 हजार 200 शिक्षकांच्या चाचण्या पूण झाल्या असून येणार्या तीन दिवसांत सोमवारच्या आत 14 हजार शिक्षकांच्या चाचण्यापूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

दररोज 1 हजार चाचण्या

जिल्ह्यात शासकीय यंत्रणे मार्फत सर्वसामान्य रुग्णांसोबत दररोज 1 हजार शिक्षकांची करोनाची चाचणी करण्यात येत आहे. गुरूवारी शिक्षकांच्या चाचणीचा तिसरा दिवस होता. बुधवारपर्यत 2 हजार 200 शिक्षकांची करोना चाचणी पूर्ण झाली होती. चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यास काही तासांचा कालावधी लागत असून त्यानंतर आधी आरोग्य विभाग आणि त्यानंतर शिक्षण विभागाकडे चाचणीचा अहवाल तयार होत आहे.