टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यासाठी

शासनाच्या नियमानुसार सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परंतु अद्याप शिक्षकांची करोना चाचणी झाली नसल्याने आज सोमवार दि. 23 नोव्हेंबर रोजी भरणारी शाळा सध्या तरी भरणार नाही. तसेच सर्व शिक्षकांची करोना चाचणी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विलास पवार यांनी दिली.

ते म्हणाले, शाळेत इयत्ता 9 ते 12 वीची पटसंख्या 640 असून त्यासाठी 31 शिक्षक कार्यरत आहेत. येथील सर्व शिक्षक करोना चाचणीसाठी राहुरी कृषी विद्यापीठातील करोना सेंटरवर जात आहेत. परंतु तेथे पुरेसे करोना टेस्ट कीट उपलब्ध नसल्यामुळे या शिक्षकांची करोना टेस्ट झाली नाही.

तरी येत्या दोन दिवसांत ही टेस्ट पूर्ण होऊन रिपोर्ट आल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल. दरम्यान शाळा सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून पालकांनी संमतीपत्र भरून दिल्यानंतरच त्यांच्या पाल्यास शाळेत प्रवेश दिला जाणार असून शाळेत येण्यासाठी कुणावरही सक्ती केली जाणार नाही. तसेच सध्या सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शाळा गेल्या 8 महिन्यांपासून बंद आहेत. दरम्यानच्या काळात ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक परिश्रम घेत आहेत. राज्यातून करोना अद्याप गेलेला नाही. राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात येत आहे. तरीही शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान राज्यात दिवाळी सणानंतर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय दुसर्या लाटेची भीती पालकांच्या मनात आहे. यामुळे अनेक शहरांतील तसेच काही जिल्ह्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याप्रमाणे खेड्यातील लोकांनीही शासनाने शाळेबाबतचा निर्णयाचा फेरविचार करावा व राज्यात सर्वत्र करोना लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात, अशा प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत. शिवाय शाळेतील सर्व मुले व शिक्षकांची जबाबदारीही शासनाने घेतली पाहिजे, असेही नागरिकांत बोलले जात आहे.