शिक्षिकेला दमदाटी शिक्षकाला मारहाण

नगरमध्ये गुन्हा दाखल
शिक्षिकेला दमदाटी शिक्षकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील गुंडेगावच्या केंद्र शाळेत प्राथमिक शिक्षकांच्या बैठकीत घुसून महिला शिक्षकांना दमदाटी करत पुरूष शिक्षकांची थेट गच्चांडी पकडणार्‍या, तसेच शाळा सुटल्यानंतर रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण करणार्‍या गुंडेगावच्या भाऊसाहेब शिंदे विरोधात नगर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नगर तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक नेते आणि महिला शिक्षकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी करत आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली.

याप्रकरणी विजय सुदाम कडूस (रा. कासार मळा, गुंडेगाव) शाळा तुकाईमळा, प्राथमिक शाळा, गुंडेगाव यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्षक कडूस यांच्या तक्रारीवरून भाऊसाहेब शिंदे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे, शिवीगळ, जिवे मारण्याची धमकी या कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक कडूस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, शनिवारी दुपारी गुंडेगावच्या केंद्र शाळेत केंद्रप्रमुख मंदा जगताप यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पोषण आहार अधिक्षक प्रदीप शिंदे, केंद्रप्रमुख जगताप, शिक्षक संजय शेलार, ईश्वर नागवडे, सुहास बोठे, भाऊसाहेब जाधव, संगीता भुजबळ, दिपस्वी पवार, शुभांगी मोरे, मनिषा भालसिंग, ज्ञानदेव कुसळकर, अलका शिरसागर, मंदा शिंदे, गहिनीनाथ पिंपळे, विलास कदम, प्रतिभा निक्रड, जयश्री दिवटे, पद्मावती धुमाळ आदी शिक्षक हजर होते.

बैठक सुरू असतांना दुपारी 12.15 च्या सुमारास आरोप शिंदे त्याठिकाणी आला आणि खुर्ची टाकून शाळेच्या दारात बसत, तुम्ही शिक्षक शाळेत उशीरा येतात. शाळेत देण्यात येणार आहाराचा दर्जा खराब असा आरडा ओरड केली. त्यावेळी शिक्षक पिंपळे यांनी वेतन अधीक्षक शिंदे यांना विचारले की शिक्षकांच्या बैठकीला बाहेरच्या व्यक्तींना परवागी आहे का?, त्यावर आरोपी शिंदे यांनी शिक्षकांना लाज वाटते का?, घरभाडे फुकटचे घेता असे आरोप केले. त्यावर शिक्षक कडूस यांनी आमच्या बैठकीत व्यत्यय आणून नका, अशी विनंती केली.

त्यावर आरोपी शिंदे याने तुला काय करायचे, माझी कलेक्टरांसोबत ओळख आहे, तुमची बदलीच करतो, असा दम भरला. त्यावर महिला शिक्षिका धुमाळ यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता शिंदे त्यांच्यावर धावू गेला. त्यावर मी शिंदे याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, माझी गच्चांडी त्याने पकडली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आमची बैठक होवू दिली नाही. त्यानंतर शाळा सुटल्यावर घरी येत असतांना रस्त्यात अडवून पुन्हा शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कडूस यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिक्षक कडूस यांच्या तक्रारी वरून भाऊसाहेब शिंदे विरोधात तालुका पोलीस ठाण्यात भादवी 353, 341, 323, 504 आणि 506 नूसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्षक संघटनेचे डॉ. संजय कळमकर, संजय धामणे, गुरूमाऊली मंडळाचे पदाधिकारी यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी मोठ्या संख्येने नगर तालुक्यातील शिक्षक जमा झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com