शिक्षक बँंकेसह 13 सहकारी संस्थांचा आज प्रारूप याद्या होणार प्रसिध्द

सहकार खात्याची माहिती : 25 दिवसांनंतर होणार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
शिक्षक बँंकेसह 13 सहकारी संस्थांचा 
आज प्रारूप याद्या होणार प्रसिध्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार आहे. मंगळवारी (दि.3) रोजी शिक्षक बँकेसह जिल्ह्यातील 13 सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर हरकती आणि सुनावण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी राहणार असून अंतिम मतदार यादी प्रसिध्द होताच शिक्षक बँकेसह अन्य सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नगर जिल्हा शिक्षक बँकेची मुदत फेबु्रवारी 2021 मध्येच संपली होती. मात्र, कोविडमुळे साधारणपणे एक ते सव्वा वर्षे बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली होती. त्याच सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाने मागील सर्वसाधारण सभेत बँकेची निवडणुक तातडीने घेण्याचा ठराव घेतला होता. तर काही शिक्षक संघटनांनी बँकेची निवडणूक व्हावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. जिल्ह्यात कोविडमुळे हजारो सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकल्या होत्या. यात विविध कार्यकारी सोसायटी आणि अन्य सहकारी संस्थांचा समावेश होता.

यात शिक्षक बँकेचा समावेश होता. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत एकूण 10 हजार 545 शिक्षक सभासद असून यातून 10 हजार 502 शिक्षक सभासद पात्र मतदार आहेत. 43 शिक्षक सभासद हे मयत, परागंदा, थकबाकीदार अथवा आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेले आहेत. यातील थकबाकीदार शिक्षक सभासदांनी थकबाकी भरल्यास मतदानाला पात्र ठरणार आहे. सहकार विभागाला बँक प्रशासनाने सादर केलेल्या प्रारूप मतदार यादीत 10 हजार 502 सभासदांची नावे देण्यात आली असून सहकार विभाग त्याची पडताळणी करून ती आज प्रारूप यादी प्रसिध्द करणार आहेत. ही प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर त्यावर 25 दिवसांत हरकती घेवून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो असा संकेत असल्याने लवकरच शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

शिक्षक बँकेसह नगर तालुक्यातील अकोळनेर सोसायटी, व्ही.आर.डी.ई. सिव्हीलियन्स सहकारी क्रेडीट सोसायटी नगर, बी.पी. हिवाळे सेवकांची सहकारी पतसंस्था, नगर. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्था, नगर. सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था, संगमनेर. वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था, बाभळेश्वर (राहाता). प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था तांत्रिक व अतांत्रिक सेवकांची सहकारी संस्था लोणी. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना नोकरांची सहकारी पतपेढी, प्रवरानगर. कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्यादित महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी. मुळे सहकारी ग्राहक संस्था, सोनई. घोडेगाव नंबर 1 विविध कार्यकारी सोसायटी, श्रीगोंदा. सखूबाई विविध कार्यकारी सेवा संस्था तारडगव्हाण, श्रीगोंदा. श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था काष्टी, श्रीगोंदा या संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार आहेत.

Related Stories

No stories found.