अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याने 30 ते 35 हजार शिक्षक राज्याला दिले आहेत. जिल्ह्याबाहेर असलेल्या भूमिपुत्रांना बँकेमार्फत कर्ज मिळावे

यासाठी बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी करण्यात येणार आहे. यामध्ये सभासदांचा फायदाच आहे. कर्ज वसुलीसाठी नियमावली तयार केली असून बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी केले तरी शाखा काढली जाणार नसल्याची माहिती शिक्षक बँकेच्या सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाने दिली.

रविवारी होणार्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, बँकेचे चेअरमन राजू रहाणे, व्हाईस चेअरमन उषा बनकर, सलीमखान पठाण, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, विद्या आढाव, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाठ, बाबासाहेब खरात, किसन खेमनर, गंगाराम गोडे, अनिल भवार, सुयोग पवार आदी उपस्थित होते.

वार्षिक सभा आली की प्रसिद्धी मिळविण्यासाठी पत्रकबाजी करणार्या आणि प्रत्यक्ष आचरणात विसंगती असणार्या लोकांना जिल्ह्यातील सभासद चांगले ओळखून आहेत. शिक्षक बँकेचा झालेला कारभार सर्व सभासदांसाठी खुला असून कोणीही कधीही बँकेत येऊन त्याची खातरजमा करू शकतो. बिनबुडाचे आरोप करून विरोधक फक्त स्वतःचे हसू करून घेत असल्याची टीका गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तांबे यांनी केली.

बँकेचा कारभार अतिशय काटकसरीचा झाल्यामुळे सव्वा आठ टक्के कायम ठेवीला व्याज देऊन कर्जाचा व्याजदर साडेनऊ टक्के केला आहे. पाच वर्षांमध्ये कर्जाच्या व्याज दरात कोणतीही वाढ न करता तो सातत्याने कमी केला आहे. पूर्वी निवडणूक झाल्यावर व्याजदर वाढविण्याची परंपरा होती. ती आमच्या संचालक मंडळाने खंडित केली आहे. कर्ज मर्यादा 35 लाख रुपयापर्यंत केली.

सभासदांनी व ठेवीदारांच्या संचालक मंडळावरील विश्वासामुळे हे शक्य झाले असे बँकेचे चेअरमन राजू राहाणे यांनी सांगितले. बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याबाबत विरोधकांनी सध्या रान उठवले असून त्यांची ही भीती अनाठायी आहे. या बँकेला नख लावण्याचा प्रयत्न आमच्याकडून कदापि होणार नाही.

उलट शांतपणे जर विचार केला तर कार्यक्षेत्र वाढविल्याने बँकेच्या व्यावसायिक उत्पन्नात भर पडणार असून त्याचा फायदा सभासदांना होणार आहे, असे गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष साळवे यांनी सांगितले.