
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी काल (गुरूवार) शेवटच्या दिवशी 144 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण प्राप्त अर्जांची संख्या 852 झाली असून यंदा निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार असून काही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज (शुक्रवार) अर्जांची छाननी केली जाणार असून सोमवार, 27 जून रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 17 जूनपासून सुरूवात झाली होती. पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात अर्ज विक्री होत होती. एकूण एक हजार 266 अर्जांची विक्री होऊन शेवटच्या दिवसापर्यंत 852 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पहिल्या दिवशी 17 जून रोजी फक्त पाच अर्ज दाखल झाले होते. शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे अर्ज दाखल झाले नाही. मात्र, सोमवारपासून मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली. सोमवारी 120, मंगळवारी तब्बल 341, बुधवारी 242 तर काल गुरूवार 144 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी 14 तालुक्याचे 14 सर्वसाधारण मतदारसंघ त्यासोबत महिला राखीव, इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एनटी, नॉनटिंचीग आणि भिंगार छावणी मंडळ असे मतदारसंघ आहेत. दरम्यान 27 जून रोजी अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर 12 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी एकुण 11 मंडळे सक्रिय असली तरी तीन मंडळातील चार गटांमध्ये खरी लढत पाहिला मिळणार आहे. यामध्ये गुरूमाऊली मंडळाचे तांबे व रोहकले असे दोन गट असून गुरूकुल व सदिच्छा मंडळ निवडणुकीत सक्रिय आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात कोण-कोणासोबत युती करते त्यावरून पुढील गणित ठरणार आहे.
सर्वाधिक अर्ज संगमनेरातून
मतदारसघनिहाय उमेदवारी दाखल झालेले अर्ज-संगमनेर 46, नगर 41, पारनेर 42, कोपरगाव 25, राहाता 28, श्रीरामपूर 37, जामखेड 40, पाथर्डी 43, राहुरी 26, शेवगाव 25, श्रीगोंदा 41, अकोले 27, नेवासा 41, कर्जत 31, भिंगार 36, अनुसूचित जाती-जमाती 65, महिला राखीव 103, ओबीसी 90 आणि एनटी 65 अशा 852 अर्जाचा समावेश आहे.