अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा शिक्षक बँकेकडे कर्मचार्यांची संख्या कमी आहे. बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी केल्यास वसूली होणार नाही,

यामुळे बँक बुडेल. बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी करण्याबाबत पोटनियम दुरूस्तीला संघटना समन्वय समितीचा प्रखर विरोध असून पोटनियम दुरूस्ती कदापी होऊ देणार नसल्याची भूमिका विरोधी आघाडीने घेतली आहे.

याबाबत पत्रकार परिषद घेऊन विरोधी आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिक्षक संघाचे राजेंद्र शिंदे, संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, शिक्षक परिषदेचे प्रवीण ठुबे, गुरूमाऊलीचे विकास डावखरे, सदिच्छाचे नारायण राऊत, सेवा संघाचे बाळासाहेब देंडगे, इब्टाचे एकनाथ व्यवहारे, आबासाहेब लोंढे, एकल मंचचे लक्ष्मण नरसाळे, रहेमान शेख, रघुनाथ झावरे ,बाळासाहेब मोरे, विशाल खरमाळे, पी. एस. झरेकर, विलास डावखरे, प्रवीण शेरकर, राजभोज नानासाहेब, अरुण मोकळ, बाबाजी आव्हाड, सतीश चाबुस्कवार, अंबादास गारूडकर आदी उपस्थित होते.

शिक्षक बँकेने शताब्दी निधीच्या नावाखाली सुमारे 1 कोटी रूपयाची तरतूद करून ठेवली होती. त्या तरतूदीतून सभासद म्हणून प्रत्येकाला लाभ मिळणे आवश्यक असताना केवळ स्वत:चा उदोउदो करण्याकरिता हा निधी खर्च केला आहे. सावित्रीच्या लेकीचा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमावर जवळजवळ 10 लाख रूपये खर्ची घालून शताब्दी निधीची उधळपट्टी सतारूढ मंडळाने केलेली आहे.

घड्याळ खरेदीच्या नावाखाली लाखो रूपयाची उधळपट्टी सत्ताधार्यांनी केली. तसेच कन्यादान योजना गुंडाळून शुभमंगल योजनेचा पोटनियम दुरूस्तीत आणली आहे. सभासद ठेवी कपातीबाबत निर्णय घेताना त्या निर्णयांना वार्षिक सभेची मंजूरी घेणे आवश्यक असते, परंतु सभासद ठेवीत कपात करण्याचा निर्णय वार्षिक सभेसमोर न आणता बेकायदा पद्धतीने कायमठेव कपात कमी करण्याचा घटनाबाह्य निर्णय घेतलेला असून तो निर्णय मागे घेण्याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आल्याची माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.