शिक्षक बँकेत गुरुमाऊली मंडळ स्वबळावर लढणार - बापूसाहेब तांबे

शिक्षक बँकेत गुरुमाऊली मंडळ स्वबळावर लढणार - बापूसाहेब तांबे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या अडीच वर्षामध्ये शिक्षक बँकेत आमच्या संचालक मंडळाने केलेल्या सभासद हिताच्या कारभारामुळे आम्ही जिल्ह्यातील सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सत्तेसाठी नव्हे, जिंकण्यासाठी नव्हे तर सभासद हितासाठी आम्ही निवडणूक लढवित असून सभासद आम्हालाच पुन्हा संधी देणार आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आमची अमक्याबरोबर युती होणार तमक्याबरोबर युती होणार अशा प्रकारच्या अफवा जाणीवपुर्वक पसरविण्याचे काम विरोधी गट करीत आहे. परंतु गुरुमाऊली मंडळ कुणाबरोबरही युती करणार नाही तर आम्ही स्वबळावरच शिक्षक बँकेची निवडणूक लढविणार असून पुन्हा एकदा बँकेमध्ये गुरुमाऊली मंडळाची सत्ता येणार असल्याचा आत्मविश्वास सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी व्यक्त केला.

शिक्षक बँकेची मतदार यादी काल अंतिम झाली असून लवकरच बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची निवडणुकीच्या नियोजनाची सभा शिक्षक बँकेच्या भा. दा. पाटील गुरुजी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे होते. जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अंजली मुळे, कार्याध्यक्ष मीनाक्षी अवचरे, सरचिटणीस वनिता सुंबे, बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, सलीमखान पठाण, शरद सुद्रिक, राजू राहाणे, विद्यमान चेअरमन किसन खेमनर, व्हाईस चेअरमन सुयोग पवार, माजी व्हा चेअरमन बाबा खरात, अर्जुन शिरसाट, आबा दळवी, बाळासाहेब सरोदे, अर्जुन बडोगे, भाऊराव राहिंज, सुरेश निवडुंगे, मंगेश खिलारी आदींसह जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या सभेस उपस्थित होते.

प्रत्येक तालुक्याचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येऊन आपण स्वबळावर लढण्यास सक्षम असल्यामुळे आपल्याला कुणाशी युती करण्याची आवश्यकता नाही असे मत बहुतांश तालुकाध्यक्षांनी मांडले. निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना देखील यावेळी करण्यात आल्या.

माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी गुरुमाऊलीच्या रोहोकले गटाच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. एकदा निवडणूक जाहीर होऊ द्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ असे ते म्हणाले. माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी साडेतीन वर्षाचा कारभार आणि अडीच वर्षाचा कारभार याबाबत समोरासमोर व्यासपीठावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

विरोधी गटाला निवडणुकीची चिंता पडल्याने विद्यमान गुरुमाऊली मंडळ बदनाम करण्यासाठी आपण गुरुकुल बरोबर जाणार असल्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे. याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी सांगितले की, जिल्ह्याचा आढावा घेतला असता आपण स्वबळावर निवडून येऊ शकतो. अनेक घटक आपल्या संपर्कात आहेत. मात्र आपण कोणाशी युती करणार नाही. अडीच वर्षांमध्ये आपण कर्जावरील व्याज दोन टक्के कमी केले. यापूर्वी निवडणूक झाल्यानंतर व्याजदर वाढविण्याची परंपरा आपण खंडित केली.

आता सध्या जो विद्यमान कर्जाचा व्याजदर आहे तो कोणत्याही परिस्थितीत भविष्यात वाढवला जाणार नाही अशा प्रकारचे आश्वासन आपण सभासदांना देणार आहोत. भविष्यात जेवढे कमी करता येईल तेवढे व्याज कमी करू. सभासद हिताच्या अनेक योजना आपण राबविल्या. गुरुमाऊली मंडळाचे सर्व निर्णय हे मंडळाच्या सभेत झाले. गुरुमाऊली मंडळामध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे. मेरी आवाज सुनो हा प्रकार येथे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना जशा व्यक्त होतात त्याप्रमाणे गुरुमाऊली मंडळ निर्णय घेते. शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने अत्यंत आदर्श असा कारभार केला आहे . त्यामुळे या संचालक मंडळाच्या कारभाराच्या जोरावरच निवडणूक आपण जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी भूलथापांना बळी न पडता कामास लागावे असे आवाहन त्यांनी केले .

गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. जिल्ह्यातील इतर मंडळे आपल्या बरोबर युती करण्यास उत्सुक आहेत . आपण कुणाशीही युती बाबत भाष्य केलेले नाही. आपण होऊन कोणाबरोबर ही जाणार नाही. स्वबळावर आपण ही निवडणूक जिंकू असे ते म्हणाले.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली मुळे यांनी निवडणुकीमध्ये महिलांना 50 टक्के तिकीटे देण्याची मागणी केली.सुट्टीचा काळ असूनही या सहविचार सभेला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव फुंदे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com