शिक्षक बँकेसाठी मंडळांचे तालुका इच्छुकांचे चाचपणी मेळावे

शुक्रवारीपासून दाखल करता येणार उमेदवारी अर्ज
शिक्षक बँकेसाठी मंडळांचे तालुका इच्छुकांचे चाचपणी मेळावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरणार्‍या सर्व शिक्षक मंडळ आणि संघटनांचे तालुकानिहाय इच्छुकांचे चाचपणी मेळावे सुरू आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात असणार्‍या निवडणुकीची स्थिती, इच्छुकांची संख्या आणि विजयश्रीसाठी काय करावे लागले, याचा अंदाज मंडळांचे प्रमुख आणि शिक्षक नेते बांधतांना दिसत आहेत. दरम्यान, येत्या शुक्रवार (दि.17) बँकेच्या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे.

जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी दिवसंदिवस रंगत वाढत आहे. नेते तालुकानिहाय अंदाज घेत असून कोणत्या तालुक्यात कोणाला उमेदवारी द्यावी, याची चाचपणी सुरू आहे. यासाठी तालुकानिहाय उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍यांची चाचपणी मेळावे घेण्यात येत आहे. हे मेळावे घेण्यात सत्ताधार्‍यांपासून विरोधकही मागे नाहीत. आज या तालुक्यात या मंडळाचा तर दुसर्‍या दिवशी दुसर्‍या तालुक्यात दुसर्‍या मंडळाचे मेळावे सुरू आहेत. या मेळाव्यामुळे तालुक्या तालुक्यात शिक्षकांचे राजकारण जोरात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बुधवारपासून शाळा सुरू असल्याने त्या आधी निवडणुकीत उतरणार्‍या सर्वच मंडळाने तालुकानिहाय मेळाव्याचे शेड्यूल पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी 24 जुलैला मतदान होणार असून या निवडणुकीत तिरंगी अथवा चौरंगी लढत होईल, असे आताचे चित्र आहे. मात्र, पुढे कोण कोणाच्या सोबत जाणार, कोण कोणाच्या खांद्यावर हात टाकणार यासाठी आठ दिवस वाट पाहवी लागणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान परिस्थिती प्रमुख मंडळांसह छोट्या मोठ्या संघटना अशा 12 संघटना आणि मंडळे आहेत. या सर्व संघटना आणि मंडळ ऐनवेळी काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

सत्ताधारी मागील पाच वर्षातील बँकेची आर्थिक प्रगती सभासदांसमोर मांडणार असून विरोधक पाच वर्षातील सत्ताधार्‍यांच्या चुकांवर बोट ठेवणार आहेत. शिक्षक सभासद कोणाच्या बाजूने झुकणार यासाठी मतमोजणीची वाट पाहवी लागणार आहे. बुधवारपासून शाळा सुरू आहेत. शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांच्या निवडणुक दौर्‍यावर बंधने येणार आहेत. निवडणुकीसाठी किती शिक्षक रजा घेणार याकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

फुटतुटीवर नेत्यांचे लक्ष

बँकेच्या निवडणुकीत अन्य मंडळातील कोण कोण फुटण्यासारखे आहे. विरोधी गटाच्या कोणाला गळाला लावता येईल, यासाठी जिल्हाभर प्रयत्न सुरू आहेत. ऐनवेळी आपले कार्यकर्ते फुटायला नको, यासाठी नेते प्रमुख कार्यकर्त्यांची जपणूक करतांना दिसत आहे. तसेच इच्छुकांची संख्या वाढल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी नेत्याचे आतापासून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com