शिक्षक बँक निवडणुकीमुळे विद्यार्थी अन् शिक्षकांचा एकाच वेळी गोंधळ !

13 जूनला शाळा उघडणार तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात बँकेसाठी मतदानाची शक्यता
शिक्षक बँक निवडणुकीमुळे विद्यार्थी अन् शिक्षकांचा एकाच वेळी गोंधळ !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवार (दि.3) प्रारूप यादी प्रसिध्द झाली आहे. या प्रारूप मतदार यादीत 10 हजार 502 सभासद मतदरांची नावे बँकेच्या शाखानिहाय प्रसिध्द करण्यात आली आहे. आता 30 मे रोजी त्यावर हरकती सुनावणी होवून अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर लगेच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला तरी पुढील 35 दिवसानंतर मतदान होणार आहे. यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात बँकेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 13 जूनपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार असून यामुळे बँकेची रणधुमाळी आणि मतदान यामुळे एकाच वेळी विद्यार्थी आणि शिक्षकांचा गोंधळ उडणार आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षकांची पंचवार्षिक निवडणूक कोविडमुळे सुमारे सव्वा वर्ष लांबली आहे. ही निवडणूक लांबल्यामुळे सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या संचालकांपैकी अनेकांना चेअरमन, व्हाईस चेअरमन होण्याची संधी मिळाली. याच सोबत सत्ता कोणाची असो बँकेची आर्थिक स्थिती उत्तम झाल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक पत वाढली आहे. भक्कम स्थितीत असणार्‍या या बँकेवर आपले वर्चस्व राहवे, यासाठी सर्वच शिक्षक मंडळ यंदाच्या निवडणुकीत चांगलाच जोर लावणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज असल्याने या शिक्षकांना निवडणुकीतील रणधुमाळीत रोखण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्य हे देखील नसणार आहेत.

मंगळवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली असून त्यावर हरकती आणि सुनावणी होवून 30 मे रोजी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. दरम्यान, सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानूसार अंतिम मतदार जाहीर झाल्यानंतर मतदान होईपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत, छाणणी, माघार, अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे, चिन्ह वाटप आणि मतदान ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 35 दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे जूनमध्ये मतदान शक्य नाही. बँकेसाठी मतदानाची तारीख ही जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातील असणार आहे. दुसरीकडे 13 जुनपासून शाळा सुरू होणार असून याच दरम्यान बँकेच्या निवडणुकीसाठी शिक्षकांच्या मंडळाच्या बैठका, प्रचार सभा, तालुकानिहाय भेटीगाठी सुरू राहणार आहे. यामुळे एकच वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. कोविडच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिमाखात सुरू होणार्‍या शैक्षणिक वर्षाला प्राथमिक शिक्षक बँकच्या निवडणुकीमुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रारूप यादीतील तालुकानिहाय मतदार

संगमनेर 1 हजार 26, नगर 773, पारनेर 845, कोपरगाव 576, श्रीरामपूर 471, जामखेड 443, पाथर्डी 752, राहुरी 780, शेवगाव 673, श्रीगोंदा 954, अकोले 1 हजार 24, नेवासा 914, कर्जत 694, राहाता- कोपरगाव 301, राहाता-श्रीरामपूर 240 असे शाखानिहाय मतदार आहेत.

Related Stories

No stories found.