कार्यालय बंद, मात्र प्रचार सुरूच !

शिक्षक बँक निवडणूक : इच्छुकांना लवकरच निवडणुकीची आशा
कार्यालय बंद, मात्र प्रचार सुरूच !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या सहकार खात्याने राज्यातील अतिवृष्टी आणि पूराचा धोका याचे कारण देत राज्यातील सहकार खात्याच्या आठ हजार संस्थांच्या निवडणूका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. यात नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचा समावेश आहे. यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणूक रिंगणातील चारही मंडळांनी सुरू केलेले नगरमधील जिल्हा कार्यालय बंद केले असले, तरी शिक्षक-गुरूजींचा प्रचार मात्र सुरू आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी आधीच्या निवडणूक कार्यक्रमानूसार रविवार (दि.24) मतदान होणार होते. त्यासाठी निवडणूक रिंगणातील चारही मंडळांनी जोरात प्रचार सुरू केला होता. प्रचारासोबत चारही मंडळांनी नगरला जिल्हा कार्यालय (वॉर रुम) सुरू केले होते. त्याठिकाणी निवडक विश्वासू शिक्षक कार्यकर्ते यांना तैनात करण्यात आले होते. याठिकाणी प्रचाराची रणनिती, कोणत्या तालुक्यात कोणी दौरे करायचे, कोणत्या तालुक्यात कोणाला गळाला लावयाचे, प्रचार साहित्य तयार करणे, पत्रके, जाहीरनामे, वचननामे तयार कराचे, सोशल मीडियावर मेसेज तयार करून पाठवायाचे, मागील निवडणुकीत प्रतिस्पर्धी मंडळाने काय आश्वसान दिले होते. त्याची वचनपुर्ती झाली की नाही, हे तपासून त्यानूसार आपआपल्या मंडळाचा अजेंडा तयार करण्याचे काम सुरू होते.

निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतांना राज्यातील अतिवृष्टी आणि पूराचे कारण पुढे करत राज्य सरकारच्या सहकार विभाग आणि सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांना स्थगिती देत, 30 सप्टेंबरनंतर घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगरच्या शिक्षक बँक निवडणुकीतील उमेदवारांच्या आनंदावर विर्जन पडले आहे. दरम्यान, काही मंडळांनी निवडणूक व्हावी, यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र, निवडणुकीसाठी स्थगिती असणार्‍या जिल्ह्यातील अगस्ती साखर कारखान्यांच्या निवडणुकीबाबत तातडीने निकाल देण्याचे खंडपीठाने टाळात त्यावर आज (दि.25) रोजी सुनावणी ठेवली. अशीच परिस्थिती शिक्षक बँकेच्या निवडणुकीची होव नयेत, यासाठी शिक्षक संघटनांनी न्यायालयाऐवजी राज्य सरकार पातळीवर निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे निवडणुकीतील सर्व मंडळांना आणि उमेदवारांना लवकर निवडणूक होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, निवडणुका पुढे गेल्याने शिक्षक कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. निवडणूक स्थगित होण्यापूर्वी सुरू असणारा नेत्यांच्या पाहुणचाराला ते मुकले आहेत. असे असले तरी सर्व मंडळाचे प्रमुख नेते आणि प्रमुख कार्यकर्ते जिल्हा पिंजून काढत आहेत. आज या तालुक्यात तर उद्या दुसर्‍या तालुक्यात दौरे सुरू असून नगरमधील जिल्हा कार्यालयाला सध्या कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

या ठिकाणी जिल्हा कार्यालय

शिक्षक बँक निवडणुकीतील चार मंडळांपैकी दोन मंडळांची कल्याण रोडवर जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आली होती. तिसर्‍या मंडळाचे बाजार समितीच्या आवारात, चौथ्या मंडळाचे टिळक रोडवरील एका बड्या हॉटेलच्या शेजारी असणार्‍या गाळात कार्यालय सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी खर्चासाठी निवडणूक रिंगणात असणार्‍या सर्वच उमेदवारांकडून त्यात्या मंडळाच्या प्रमुखांनी लाखांच्या घरात अनाम रक्कम जमा केलेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com