संचालक होण्यासाठी गुरुजींची धावपळ, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा टाहो!

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक
संचालक होण्यासाठी गुरुजींची धावपळ, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा टाहो!

लोणी |वार्ताहर| Loni

विद्यार्थ्यांची महत्त्वाची जडणघडण करणारे प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी भर पावसात मुलं दूरवरून पायपीट करीत शाळेत पोहचतात. मात्र गुरुजी शिक्षक बँकेचे संचालक होण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या मिळणार्‍या कष्टाच्या पगाराचे पैसे मुक्तपणे खर्च करून प्रचारात जुंपल्याने विद्यार्थी मात्र शिक्षणासाठी टाहो फोडत आहेत.

सध्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक सुरू आहे. या बँकेचा राज्यात आगळावेगळा नावलौकिक आहे. बँकेची निवडणूक आणि वार्षिक सभा अवघ्या महाराष्ट्राने यापूर्वी बघितलेल्या आहेत. समाजात ज्या शिक्षकांना आदराचे स्थान आहे त्यांची वर्तणूक किती ‘आदर्श’ आहे हे सांगण्याची गरज नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया महत्त्वाची आहेच पण एकविचाराने टाळता येते व इतरांपुढे आदर्श निर्माण करता येतो. तसा प्रयत्न यावेळी झाला आणि त्याबद्दल ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचे अभिनंदनही करायला हवे. त्यात यश आले नाही किंवा येऊ दिले नाही हा भाग वेगळा. खरं तर शिक्षक बँकेची ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर भूतकाळात जे घडून गेले ते सर्व धुऊन गेले असते व नव्या पिढीला एक चांगला आदर्श निर्माण झाला असता.

आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दोन नव्हे तर चार मंडळे निवडणूक रिंगणात उतरली आहेत. मंडळं आणि संघटनांमध्ये फूट पडणे, ज्यांच्या विरुद्ध यापूर्वी निवडणूक लढवली त्यांना सोबत घेऊन मोट बांधणे हे काही नवीन नाही. पण यातून गुरुजी सुद्धा पक्के राजकारणी झालेत हे अधोरेखित झाले. यापूर्वी अनेकांनी सत्ता मिळाली की आम्ही कसा आदर्श कारभार करून दाखवतो अशा भीमगर्जना केल्या पण तसे झाले का? मग आता पुन्हा सभासदांना तेच ऐकावे लागणार असले तरी त्यांचाही नाईलाजच होणार आहे. शेवटी कुणावर तरी विश्वास दाखवावाच लागणार. जर खिचडी झाली तर या बँकेचा भविष्यकाळ कसा असेल याबद्दल सांगणे कठीण.

निवडणूक होईल आणि निकालही लागेल पण मुलांचं काय? सध्या पावसाळा सुरू आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. संततधार सुरू आहे. अनेक लोक आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत पहिली ते चौथी इयत्तेमध्ये शिकणारी मुलं या पावसातही दूरवरून शिक्षणाचे धडे गिरवायला शाळेत येत आहेत. मात्र उमेदवार गुरुजी आणि त्यांचे कार्यकर्ते हक्काची रजा घेऊन प्रचाराला गेल्याने त्यांची जबाबदारी दुसर्‍या शिक्षकांवर देण्यात आली आहे. जर अशी जबाबदारी देऊन मुलांना शिक्षण देणे शक्य असेल तर इतक्या शिक्षकांची गरजच काय? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.

एक-दोन दिवसांची महत्त्वाच्या कामासाठी सुटी घेणे योग्य आहे पण पंधरा दिवस शिक्षक शाळेत नसेल तर मुलांच्या शिक्षणाचे होणारे नुकसान भरून कसे निघणार? एक शिक्षक अनेक वर्ग कसा सांभाळू शकतो? सांभाळला तरी त्याला किती अर्थ असणार? आता पंधरा दिवस फक्त शालेय पोषण आहार घेऊनच मुलांनी राहायचे का? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. वर्षभरातील रविवार, सण-वार आणि उन्हाळी सुट्ट्या विचारात घेतल्या तर शिक्षण घेण्यासाठी दिवस तरी किती उरतात? अशावेळी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून काढायला संधीही उरत नाही. काही झाले तरी मुलांचा विचार दुय्यम ठरणार हे मात्र नक्की. शेवटी जो संघटित आहे त्याला हात लावण्याचे धाडस सरकारही करू शकत नाही हे गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशातील जनतेने बघितले आहे.

यापुढे उन्हाळी सुटीत निवडणूक घ्या!

शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक बँका, पतसंस्था अथवा विद्यापीठाच्या सिनेट सारख्या निवडणुका उन्हाळी सुटीमध्ये घेतल्या जाव्यात व त्यासाठीचे शासनाने नियोजन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com