शिक्षक बँक निवडणूक : उद्या दाखल करणार याचिका

सत्ताधारी तांबे गटाच्या ‘गुरूमाऊली’ची खंडपीठात धाव
शिक्षक बँक निवडणूक : उद्या दाखल करणार याचिका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अतिवृष्टी, पूराचे कारण पुढे करत राज्य सरकारच्या सहकार विभागाने शुक्रवारी राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यात नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँंकेचाही समावेश असून राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्याचा निर्णय शिक्षक बँकेच्या सत्ताधारी गुरूमाउली मंडळाने (तांबे गट) यांनी घेतला आहे. शनिवारी तांबे गटाने औरंगाबादला धाव घेत याचिका दाखल करण्याची तयारी पूर्ण केली असून सोमवारी ही याचिका दाखल होणार आहे.

शनिवारी बापू तांबे, संचालक अर्जुन शिरसाठ, साहेबराव अनाम, निवडणुकीतील उमेदवार रामेश्वर चोपडे, बाळासाहेब सरोदे आणि महेंद्र भणभणे हे औरंगाबादला गेले होते. यातील उमेदवार चोपडे आणि भणभणे हे याचिकाकर्ते होणार असून अ‍ॅड. शिवाजी शेळके यांच्या मार्फत सोमवारी ते राज्य सरकारच्या शिक्षक बँकेच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या निणर्याला आव्हान देणार आहे. राज्य सरकारने ज्या अतिवृष्टी आणि पूराचा आधार घेत शिक्षक बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला तांबे गट आव्हान देणार आहेत.

आपल्या याचिकेत चोपडे आणि भणभणे हे नगर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली नाही. जिल्ह्यात अद्याप पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही. ही संस्था पगारदार कर्मचार्‍यांची संस्था असून निवडणुकीत मतदान केंद्र हे सर्व तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही, तसेच यापूर्वीच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाने बँकेची निवडणूक तातडीने घेण्याचा ठराव घेतलेला आहे. यामुळे खंडपीठाने राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करून बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पारपडण्याची विनंती खंडपीठा करण्यात येणार असल्याची माहिती सत्ताधारी तांबे गटाच्यावतीने देण्यात आली.

दरम्यान, शनिवारी अगस्ती साखर कारखान्यांच्या निवडणुकीबाबत खंडपीठात याचिका दाखल होवून त्यावर सुनावणी झाली. यामुळे दिवसभर जिल्हाभरातील शिक्षकांकडून या याचिकेच्या सुनावणीच्या निकालाबाबत विचारणा करण्यात येत होती. अगस्ती कारखान्यांच्या निवडणुकीस परवानगी मिळाल्यास शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, अगस्ती कारखान्यांची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे अनेक शिक्षकांचा हिरमोड झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

विकास मंडळाची निवडणूक पुढे ढकलली

पूर्वी विकास मंडळ ही शिक्षक बँकेची मालमत्ता होती. मात्र, बँकिंग कायद्यानूसार बँकेला मालमत्ता ठेवता येत नसल्याने विकास मंडळ आणि मंडळाच्या जागेसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. तसेच बँकेचे सभासदांना मंडळाचे सभासद करण्यात आले. मंडळाच्या बायलॉजमध्ये बँकेच्या निवडणुकीसोबत मंडळाची निवडणूक घेण्याची तरतूद असल्याने आता बँकेची निवडणूक पुढे गेल्याने विकास मंडळाची निवडणूक पुढे गेली आहे. मंडळाच्या 18 विश्वस्तांच्या जागेसाठी 72 उमेदवार निवडणूक रिंगणात असून याठिकाणी बँकेप्रमाणे चार मंडळात लढत होणार आहे.

रोहकले गटाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील रावसाहेब रोहकले गटाच्या वतीने बँकेची निवडणूक तातडीने घ्यावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार आयुक्त अनिल कवडे, निवडणूक प्राधिकरणांचे वसंत पाटील यांना पत्र देवून मागणी करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी रोहकले गटाने बँकेची निवडणूक व्हावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेव्दारे पुन्हा तातडीने निवडणूक व्हावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे रोहकले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com