शिक्षक बँक निवडणूक : उमेदवारी अर्जांची संख्या 466

उद्या शेवटचा दिवस
शिक्षक बँक निवडणूक : उमेदवारी अर्जांची संख्या 466

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस बाकी आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारी असणार्‍या सभागृहात मंगळवारी पहावयास मिळाली. काल नव्याने 341 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामुळे दाखल अर्जाची एकूण संख्या 466 वर पोहचली आहे. यामुळे यंदाच्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी पहावयास मिळणार आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी तिसरा दिवस होता. मागील शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली होती. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने अर्ज विक्री होवून पाच अर्ज दाखल झाले होते. सोमवारी 120 तर काल 341 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे 2 दिवसात आणखी मोठ्या संख्येने बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे निवडणुकीतील मंडळ सध्या जाहीरनामा तयार करण्यात व्यस्त आहेत. यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे गट तयार करण्यात आले असून मागील वेळेसचा स्वत: आणि विरोधकांना जाहीरनामा आणि त्यात दिलेले आश्वासन आणि त्यांची पुर्तता झालेली आहे की नाही, नव्याने करण्यात येणार्‍या घोषणाचा याचा अभ्यास करण्यात येत आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी 14 तालुक्याचे 14 सर्वसाधारण मतदारसंघ त्याच सोबत महिला राखीव, इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एनटी, नॉनटिंचीग आणि भिंगार छावणी मंडळ असे मतदारसंघ आहेत. तर काल नव्याने 103 उमेदवारी अर्जाची विक्री झालेली असून विक्री झालेल्या अर्जाची संख्या आता 1 हजार 188 झाली असल्याची माहिती साहयक निवडणूक अधिकारी देवीदास घोडेचोर यांनी दिली.

छाणनीनंतर बोलणीवर अखेरचा हात

बँकेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्व मंडळाकडून मोठ्या संख्याने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत. यात काही हौशी मंडळी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करून त्याची छाणनी झाल्यानंतर मंडळनिहाय उमदेवारांची यादी समोर आल्याने कोणत्या तालुक्यात कोणाचे प्रबल्य आहे, याचा अभ्यास करून निवडणूक रिंगणात असणार्‍या मंडळाच्या बोलणीचा अखेरचे स्वरूप येणार आहे.

विकास मंडळासाठी 199 अर्जांची विक्री

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसोबत होणार्‍या विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 764 उमेदवारी अर्जाची विक्री झालेली असून 18 विश्वस्त मंडळाच्या जागसाठी मंगळवार अखेर 199 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.

मतदारसंघनिहाय उमदेवारी अर्ज

संगमनेर 32, नगर 11, पारनेर 21, कोपरगाव 15, राहाता 21, श्रीरामपूर 26, जामखेड 21, पाथर्डी 29, राहुरी 15, शेवगाव 16, श्रीगोंदा 19, अकोले 15, नेवासा 22, कर्जत 19, भिंगार 13, अनुसूचित जाती-जमाती 24, महिला राखीव 49, ओबीसी 55 आणि एनटी 43 अशा 466 अर्जाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com