आघाडीसाठी गुप्त बैठका सुरू

शिक्षक बँक निवडणूक || उमेदवारी दाखल झाल्यावर होणार चित्र स्पष्ट
आघाडीसाठी गुप्त बैठका सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व मंडळ आणि शिक्षक संघटनांनी कंबर कसली आहे. यामुळे उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी 719 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून निवडणुकीत आघाडी अथवा युती करण्यासाठी सर्व मंडळांकडून चाचपणी सुरू असून आघाडी, युतीची बोलणी करण्यासाठी सर्व मंडळ आणि संघटनामध्ये ‘पहले आप, पहले आप, पहले आप’चा सूर आळवण्यात येत आहे.

दरम्यान, गुरूकुल आणि सदिच्छा मंडळात तसेच गुरूमाऊली रोहकले गट आणि इब्टा यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याची वंदता आहे. तर गुरूमाऊलीच्या तांबे गटाने स्वबळावर लढावे असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.

जिल्हा शिक्षक बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी पुढील महिन्यांत 24 तारखेला मतदान होणार आहे. बँकेसाठी 10 हजार 406 मतदार असून या आर्थिक सत्तेवर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना आणि मंडळांनी कंबर कसली आहे. ऐवढंच काय आतातर राज्यातील नेते देखील जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत डोकावण्यास सुरूवात केली आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असून काही मंडळांनी आधीच एकला चलो रे चा नारा दिला असला तरी आघाडी आणि युतीसाठी करण्यासाठी आतून त्यांची बोलणी सुरू आहे.

दरम्यान, काल रविवारी सर्व मंडळाच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाव्य आणि इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेतले असून ते अर्ज आज सोमवारी अथवा उद्या मंगळवारी दाखल होणार आहे. यासह काही अपक्षांनी देखील निवडणुकीसाठी तयारी केली असून त्यांचे अर्ज दाखल होणार आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आणि अर्ज विकत घेण्यासाठी गुरूवार (दि.23) पर्यंत मुदत असल्याने बँकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे शिक्षक संभासदासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.

दुसरीकडे शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांचे अध्यापन संभाळून शिक्षकांना आप आपल्या मंडळाचा प्रचार करावा लागणार आहे. काही मंडळांनी नगरमध्ये खास निवडणुकीसाठी कार्यालय सुरू केली असून त्याठिकाणाहून नियोजन करण्यात येत आहे. सर्वच प्रमुख मंडळाचा जिल्ह्याचा एका दौरा पूर्ण झाला असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मंडळाची ध्येय धोरण सभासदांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत शिक्षकांचे राजकारण चांगलेच रंगणार असून यातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच निवडणुकीचा अंदाज येणार असून कोणी कोणी अर्ज दाखल केले यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

माघारीसाठी मोठा कालावधी

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज माघारीसाठी 27 जून ते 11 जुलै ऐवढा मोठा कालावधी आहे. यामुळे अनेक मंडळे आताच घाई नको, अर्ज दाखल झाल्यावर माघारीच्या कालावधीत बसून चर्चा करू आणि निवडणुकीच दिक्षा ठरवू असे सांगताना दिसत आहेत. दम्यान, या निवडणुकीत शिक्षकांच्या राजकारणातील सर्वात जुने मंडळ आणि सध्या विरोधात असणार्‍या मंडळाची युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या युतीची घोषणा यथाअवकाश होणार असल्याचे निवडणुकीतील सुत्रांनी सांगितले.

इच्छुकांचे उमेदवारी अर्ज आपापल्या मंडळांच्या प्रमुखांकडे सादर

या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून काल रविवारी अनेकांनी उमेदवारी अर्ज आपापल्या सदिच्छा, गुरूमाऊली दोन्ही गट, आणि गुरुकुल मंडळांच्या प्रमुखांकडे भरून दिले आहेत. यामुळे नगरमध्ये शिक्षकांची मांदियाळी पहावयास मिंळाली. तांबे गटाकडे तब्बल 179 उमेदवारी अर्ज इच्छुकांनी भरून दिले आहेत. इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवारी देताना मंडळ प्रमुखांची दमछाक होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com