अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधार्यांनी सभासदांना शताब्दी महोत्सवानिमित्त दिलेल्या घड्याळ खरेदीत 35 लाख रुपयांचा अपहार केला आहे.

सभासद या नात्याने आम्ही या व्यवहाराची कागदपत्रे बँकेकडे मागून देखील सभासदांचा हक्क असताना न्यायालयीन प्रक्रिया या नावाखाली संबंधित कागदपत्रे बँक प्रशासनाकडून दिली जात नाही. सत्ताधार्यांच्या दबावातून हे घडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बँकेच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

बँकेच्या या अपहारात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील सहभागी असून तत्कालीन बँकेचे अध्यक्ष व प्रशासनाने संगनमताने सभासदांची आर्थिक लूट केलेली आहे. वर्षभरापासून अर्ज विनंत्या करून देखील घडयाळ खरेदीबाबत कागदपत्रे दिली जात नाहीत. जे घड्याळ बाजारात फक्त 300 रुपयांत विकत मिळते.

त्या घड्याळाची किंमत सत्ताधार्यांनी 600 रुपये लावली आहे. या संबंधातील सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून आम्ही सनदशीर मार्गाने डी. डी. आर यांनी नियुक्त केलेल्या चौकशी अधिकार्यांकडे 6 जानेवारी रोजी देणार आहोत.

चौकशी सुरू झाली असून चौकशी अधिकारी खेडेकर यांचे पत्र प्राप्त झाले आहे. या प्रकरणात चौकशी अधिकार्यांकडून न्याय न मिळाल्यास वरिष्ठ कार्यालय व न्यायव्यवस्थेकडे न्याय मागणार असल्याचे रावसाहेब रोहकले प्रणित गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी संजय शेळके, प्रवीण ठुबे, आर. पी. रहाणे, राजेंद्र थोरात, संजय शिंदे, दत्ता गमे, गणपत सहाणे, संतोष अकोलकर, बाबा पवार, राजेंद्र मुंगसे, मंजुषा नरवडे, नाना बडाख, तुषार तुपे, गणेश वाघ, सुनिल दुधाडे, भाऊसाहेब ढोकरे, शंकर गाडेकर, दत्ता गरूड, राजू मोहोळकर, सोमनाथ घुले, संजय दळवी, गोरख देशमुख, कल्याण पोटभरे, संजय उदार, बाबा तांबे, राजाभाऊ पालवे, बाळासाहेब रोहोकले, विठ्ठल देशमुख, दत्तात्रय चोथे, दशरथ ढोले, खंडेराव उदे, बाबा धरम, अल्ताफ शहा आदी उपस्थित होते.