तरवडी गाव हे प्रबोधनाचे पॉवर हाऊस : डॉ. सदानंद मोरे

‘सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील’ ग्रंथाचे प्रकाशन
तरवडी गाव हे प्रबोधनाचे पॉवर हाऊस : डॉ. सदानंद मोरे

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

‘दीनमित्र’ साप्ताहिकाने आपल्या वैचारिक लेखनातून तत्कालीन सर्व प्रश्न निर्भिडपणे मांडले. ‘दीनमित्र’ हे इतिहास घडविणारे पत्र होते. तरवडी गाव हे प्रबोधनाचे एक पॉवर हाऊस आहे, त्या पॉवरमधून निघणार्‍या होल्टेजचे अनेकांना धक्के बसले. या पॉवर हाऊस मधील असणार्‍या इंधनातून कशी वीज निर्माण करायची व ती समाजात कशी खेळवून समाज प्रबोधन कसे करावे हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

तरवडी येथे नायगाव (ता. पैठण) येथील ज्येष्ठ साहित्यीक गणपत अंबादास उगले लिखित सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील (जीवन कार्य आणि लेखन समीक्षा) या ग्रंथाचे प्रकाशन डॉ.मोरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग अध्यक्षस्थानी होते. डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, अक्षर प्रकाशनचे बाळासाहेब घोंगडे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, डॉ.अशोक ढगे, कॉ. बाबा आरगडे , प्रा. महेबुब सय्यद, साहित्यिक संजय कळमकर, प्राचार्य विश्वासराव काळे व्यासपीठावर होते.

प्रारंभी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. सुधाकर शेलार यांनी ग्रंथ निर्मीतीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, एकूण 61 लोक एकत्रीत येऊन त्यांच्या देणगीतून या ग्रंथाची निर्मीती झाली. या ग्रंथाच्या प्रती लोकांना भेट देऊन वाचन संस्कृती चळवळ वृद्धीगत करावी.

या ग्रंथाचे लेखक जी. ए. उगले यांनी सांगितले की, या संशोधनात्मक चरीत्रातून अनेक तथ्ये मांडले आहेत. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या चरित्रातील अनेक बाबीवर प्रकाश टाकला आहे.

प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सांगितले की, मुकुंदराव समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. सत्यशोधक समाजाला गती देण्याचे काम मुकुंदराव पाटीलांनी केले. त्यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा ग्रंथ वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न प्रत्येकाने करावा.

अध्यक्ष माजी आमदार पाडुरंग अभंग म्हणाले, समाजाला भरकटू द्यायचे नसेल तर त्याचे प्रबोधन केले पाहिजे. त्यासाठी विचारवंतांनी योगदान दिले पाहिजे.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी प्राचार्य दादासाहेब वाबळे, सरपंच जालिंदर तुपे, उपसरपंच दत्तात्रय भारस्कर, नांदुर शिकारीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रखमाजी लिपणे, डॉ. प्रा. संतोष तागड, रामकृष्ण नवले, माजी सरपंच बाबासाहेब घुले, प्रा.डॉ. संजय दरवडे, शंकर भारस्कर, मनोहर बोराटे, शिवाजी महाशिकारे, कैलास म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. प्रा. शिरीष लांडगे यांनी प्रास्ताविक केले. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. सुनील इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com