तपोवनच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

शिवसेनेचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात आंदोलन
तपोवनच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

साडेतीन कोटी रुपये खर्च करूनही ‘तपोवन’ रोडचे काम झाले नाही. साडेतीन हजार खड्डे पडलेत.

पंंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या पथकाने पाहणी केली, पण अहवाल अजूनही आला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी शिवसेनेने केली.

अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याने शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी अक्षेप घेऊन कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या पुण्याच्या कार्यालयामार्फत जुलै महिन्यात कामाची पाहणी, दर्जाच्या तपासणीसाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षकांची नियुक्ती केली होती.

या पाहणीच्या अहवालाची मागणी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एच.एन. सानप यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, ऋषिकेश ढवन, दत्ता हजारे उपस्थित होते.

या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदाराने बोगस काम केले आहे. शिवसेना या ठेकेदारावर गुन्हा दखल करणार आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी अभियंता सानप यांना धारेवर धरत चौकशी व गुणवत्ता तपासणी अहवाल अद्याप का प्राप्त झाला नाही, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने हा रस्ता पुन्हा नव्याने करावा, रस्त्याच्या कामाची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढण्यात यावी, भ्रष्टाचार करणार्‍यांवर ठेकेदारावर कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकावे अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com